अलिबाग : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यात महिला आणि बालिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात खुनाचे १८ गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी १४ प्रकरणांमध्ये महिला व बालिका बळी ठरल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, त्याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी देशात व राज्यात कठोर कायदे अस्तित्वात असले, तरी प्रत्यक्षात अत्याचारांचे प्रमाण कमी झालेले नाही. उलट महिला व मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्यांची हत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र रायगडमध्ये दिसून येत आहे.

पेण तालुक्यातील एका गावात आईजवळ झोपलेल्या पाच वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्यानंतर हत्या करण्यात आली. माणगाव तालुक्यात सुट्टीसाठी आलेल्या १५ वर्षीय मुलीचा मृतदेह जंगलात आढळून आला. गोरेगाव येथील एका विश्रामगृहात २३ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. खालापूर तालुक्यातील निगडोली येथे वृद्ध दाम्पत्याची हत्या झाली. या केवळ प्रातिनिधिक घटना असून, गेल्या सहा महिन्यांत महिला व बालिकांवरील हत्यांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढल्याचे दिसून येते.

सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रभावी तपास आणि सामाजिक जागृती या तिन्ही स्तरांवर ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित होत आहे.सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रभावी तपास आणि सामाजिक जागृती या तिन्ही स्तरांवर ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित होत आहे.

सामाजिक दृष्टीकोन बदलण्याची गरज का ?

“बाजारू मूल्यांच्या प्रभावामुळे समाजातील संवेदनशीलता कमी होत आहे. स्त्रीकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. कठोर कायदेशीर कारवाईबरोबरच समाजप्रबोधनही तितकेच महत्त्वाचे आहे,” असे महिला अत्याचार विरोधी मंचाच्या संघटक वैषाली पाटील यांनी सांगितले.

तपासाची गुणवत्ता का महत्त्वाची ?

“महिलांवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणांमध्ये जलद तपास व जलद सुनावणीची मागणी केली जाते. मात्र, घाईत तपास झाल्यास कच्चे दुवे राहतात आणि त्याचा फायदा आरोपींना होतो. त्यामुळे तपास शास्त्रशुद्ध पद्धतीने होऊन आरोपींना कठोर शिक्षा होईल, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत,” असे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी नमूद केले.

पोलीसांची कारवाई काय ?

रायगड पोलीस दलाच्या हद्दीत दाखल झालेल्या १८ खून प्रकरणांपैकी १६ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणांत आतापर्यंत २१ आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. एका आरोपीचा अद्याप शोध सुरू आहे.

पोलीस तपासात समोर आलेली प्रमुख कारणे कोणती ?

पोलीस तपासानुसार महिलांच्या हत्यांमागे पुढील कारणे प्रामुख्याने आढळून आली आहेत.
लैंगिक अत्याचारानंतर हत्या
प्रेमसंबंधातील वाद
चारित्र्याच्या संशयातून हत्या
घरगुती वाद
पैशाच्या लोभातून हत्या