अलिबाग – रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने, तसेच धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने, लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या प्रकल्पातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. २८ प्रकल्पात ८४ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. १८ धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहेत. तर हेटवणे मध्यम प्रकल्पात ६४ टक्के पाणीसाठा झाला आहे.

जून महिन्याच्या सुरवातीला कोलाड येथील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या २८ प्रकल्पात १३ टक्के पाणी साठा शिल्लक होता. यातील १५ धरणांमध्ये दहा टक्क्यांहून कमी पाणी साठा शिल्लक होता. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाईचे ढग दाटले होते. जून महिन्यातील पहिले तीन आठवडे कोरडे गेल्याने परिस्थिती बिकट झाली होती.

मात्र गेल्या २८ जून नंतर जिल्ह्यात मोसमी पाऊस चांगला सक्रिय झाला आहे. जुलै महिन्याच्या जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या जोरदार सरी कोसळण्यास सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात गेल्या सहा दिवसात तब्बल सरासरी १ हजारहून अधिक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणांच्या क्षेत्रातही दमदार पाऊस पडला आहे. यामुळे धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे. ५८.९४० दशलक्ष घन मीटर पाणीसाठा या धरणांमध्ये जमा झाला आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील रानिवली, कर्जत तालुक्यातील साळोख, अवसरे आणि उरण तालुक्यातील पुनाडे या प्रकल्पांचा अपवाद सोडला. तर इतर धरणे जवळपास पूर्ण भरली आहेत. जिल्ह्यातील एकूण धरणांपैकी १८ धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहेत. अन्य पाच धरणामध्ये पंन्नास टक्केहून अधिक पाणी साठा झाला आहे. तर चार धरणामध्ये पन्नास टक्के पेक्षा कमी पाणीसाठा आहे. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यास, धरणांच्या पाणी पातळीत अजून वाढ होणे अपेक्षित असणार आहे.

कुठल्या तालुक्यात किती धरणे

रायगड जिल्ह्यात मुरुड (१), तळा (१), रोहा (१), पेण (१), अलिबाग (१), सुधागड (५), श्रीवर्धन (३), म्हसळा (२), महाड (४), कर्जत (२), खालापूर (३), पनवेल (३), उरण (१) या तेरा तालुक्यात २८ धरणे बांधली गेली आहेत. या धरणातून जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. जिल्ह्यातील २८ धरणात ६८.२६१ दलघमी पाण्याच्या साठ्याची क्षमता आहे.

उपलब्ध पाणी साठा

२१ ते ३० टक्के – सळोख, अवसरे, पुनाडे, रानिवली

५१ ते ७५ टक्के – कार्ले, श्रीगाव, ढोकशेत

७६ ते ९९ टक्के – बामणोली उसरण

१०० टक्के भरललेली धरणे…

फणसाड, वावा, सुतारवाडी, आंबेघर, कोंडगाव, घोटवडे, कवेळे, उन्हेरे, कुडकी, पाभरे संदेरी, वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, भिलवले, कोलते मोकाळी, डोणवत, मोरबे