अलिबाग – देशाच्या विकास आराखड्याचा कणा मानली जाणारी जनगणना आता पूर्णपणे डिजिटल होण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारत सरकारच्या निर्देशानुसार होणारी जनगणना ही पारंपरिक पद्धतींपासून पुढे जात तंत्रज्ञानाधारित होणार असून, रायगड जिल्हा प्रशासनाने या मोठ्या बदलासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्‍यात महाराष्‍ट्र दिनापासून सुरू होणारी “जनगणना” हा केवळ सरकारी उपक्रम न राहता प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून पूर्ण होणारा ‘डिजिटल लोकउत्सव’ ठरणार असल्याचे चित्र आहे.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या इतिहासातील १६ वी आणि स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार आहे. या डिजिटल संक्रमणासाठी प्रशासनाने मोठी यंत्रणा उभी केली आहे. जिल्ह्यातील १५ तहसीलदार, १६ मुख्याधिकारी आणि पनवेल महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, ६९ क्षेत्रीय प्रशिक्षकांमार्फत ५ हजारांहून अधिक प्रगणक आणि ८६३ पर्यवेक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. मास्टर ट्रेनर प्रकाश संकपाळ, उपविभागीय अधिकारी कर्जत आणि समन्वय अधिकारी हरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे, जनगणनेदरम्यान संकलित होणारी वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय यांसारखी माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. ही माहिती केवळ सांख्यिकीय विश्लेषण आणि विकास आराखड्यासाठीच वापरली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. “जनगणना ही केवळ आकडेवारी नसून देशाच्या भविष्यासाठीचा आराखडा आहे. रायगडकरांनी डिजिटल माध्यमाचा उपयोग करून अचूक माहिती देत या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. दरम्यान, डिजिटल जनगणनेमुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि अचूक होणार असून, रायगड जिल्हा या बदलासाठी सज्ज असल्याचे जिल्‍हाधिकारी यांनी स्‍पष्‍ट केले.

नागरिकच बनणार स्वतःचे प्रगणक

यावेळच्‍या जनगणनेत एक मोठा बदल घडणार आहे. यावेळी सरकारी यंत्रणेसोबत नागरिक स्वतःही प्रगणकाची भूमिका पार पाडणार आहेत. मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून स्वतःची माहिती स्वतः भरण्‍याची संधी प्रथमच उपलब्ध होत असल्याने जनगणना प्रक्रियेला लोकसहभागाचा नवा आयाम मिळणार आहे. पारंपरिक “दारोदार जनगणना” आता “क्लिकवर जनगणना” या स्वरूपात बदलत आहे. १ मे ते १५ मे दरम्यान नागरिकांना https://se.census.gov.in या संकेतस्थळावर स्वतःची माहिती भरता येणार आहे.

यामुळे वेळेची बचत होण्याबरोबरच माहिती अधिक अचूक मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यानंतरही प्रक्रिया थांबणार नाही. ज्यांनी ऑनलाइन माहिती भरली नाही, त्यांच्यापर्यंत प्रगणक प्रत्यक्ष पोहोचणार असून मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाईल. म्हणजेच, डिजिटल आणि पारंपरिक पद्धतींचा संगम या जनगणनेत पाहायला मिळणार आहे.