अलिबाग – रायगड जिल्ह्यातील दिडशेहून अधिक संभाव्य दरडग्रस्तगावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन उद्घोषणा प्रणाली बसविण्यात येत आहे. या प्रणालीमूळे अतिवृष्टीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयातून थेट या संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये संपर्क साधणे आणि उद्घोषणा करणे शक्य होणार आहे. राज्यात प्रथमच अशा प्रकारची व्यवस्थापन उद्घोषणा प्रणाली कार्यान्वित होणार आहे.
आपत्ती व्यवस्थापन बळकटीकरण योजने अंतर्गत ही योजना राबविली जात आहे. रायगड जिल्ह्यातील दिडशे संभाव्य दरडग्रस्त आणि पूरग्रस्त गावांमध्ये ही प्रणाली बसविण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संकल्पनेतून आत्तापर्यंत ८० गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर पावासाळ्यापूर्वी उर्वरीत ७० गावांमध्ये ही आपत्ती व्यवस्थापन उद्घोषणा प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी नाक्यांवर ही यंत्रणा बसविण्यात येत असून, यासाठी ५० हजार रुपये प्रती युनीट खर्च होणार आहे.
राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात जास्त पाऊस पडतो, पूर अतिवृष्टी, दरड कोसळणे, चक्रीवादळे यासारख्या आपत्तींना सातत्याने तोंड द्यावे लागते. कमी वेळात जास्त पाऊस पडला तर पूर परिस्थिती निर्माण होते. कमी वेळात जास्त पाऊस पडला तर भूस्खलनाच्या घटनाही घडतात. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाचे बळकटीकरणे करणे आवश्यक होते.
दुसरीकडे पावसाळ्याच्या कालावधीत हवामान विभागाकडून वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला सूचनां प्राप्त होत असतात. मात्र या सुचना थेट गावागावात पोहचवण्यासाठी सक्षम यंत्रणा अस्तित्वात नव्हती. त्यामुळे जिल्हा स्तरावरून तालुकास्तरावर आणि तालूका स्तरावरून गाव पातळीवर सूचनांचे माहितेचे आदान प्रदान होत असे, यात दिरंगाई होत असे, ही बाब लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन उद्घोषणा प्रणाली उभारण्याचा निर्णय घेण्यात आला या प्रणालीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून थेट संभाव्य आपत्तीग्रस्त गावांमध्ये थेट संपर्क साधून उद्घोषणा करणे शक्य होणार आहे.
महाड पोलादपूर तालुक्यातील वर्ग १ आणि वर्ग २ अशा संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याच बरोबर महाड, रोहा, नागोठणे आणि खोपोली या पूरग्रस्त शहरामध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. पूर परिस्थितीबाबत नागरीकांना पूर्व सूचना देणे, इषारा देणे शक्य होणार आहे. शासनाच्या योजनांची जगृती करणेही शक्य होणार आहे.
पूरप्रवण गावांसाठी टू वे कम्यूनिकेशन सिस्टीम….
दरडग्रस्त गावांप्रमाणे पूरप्रवण क्षेत्रातील गावांमधील संपर्कासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने नवी प्रणाली विकसित केली आहे. आय ट्रपीई ह्युमेनिटेरीयन टेक्नॉलॉजी बोर्ड आणि इन्स्टीट्यूट ऑफ इनफरमेश्न टेक्नॉलॉजी पूणे यांनी यासाठी सहकार्य केले आहे. जिएसएम प्रणालीवर आधारीत टू वे कम्यूनिकेशन सिस्टीम विकसित केली आहे. पूरप्रवण भागात ही सिस्टीम बसविण्यात आली आहे. बिनतारी संदेश यंत्रणेप्रमाणे ही यंत्रणा काम करणार आले. आपत्ती व्यवस्थापनातील संपर्क यंत्रणा विकसित करणे हा यामागचा मूळ उद्देश असणार आहे.
आपत्तीकाळात संपर्क यंत्रणा कार्यरत ठेवणे अतिशय महत्वाचे असते, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन उद्घोषणा प्रणाली विकसित केली आहे. ज्यामूळे सूचना आणि इशाऱ्यांची थेट उद्घोषणा गावागावात करणे शक्य होणार आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच अशी यंत्रणा आपण कार्यान्वित करत आहोत. – सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रायगड.
