सत्ताधिकाऱ्यांनी अविश्वास ठराव आणला

सत्ताधाऱ्यांच्या या अफलातून खेळीने विरोधक चारी मुंडय़ा चीत झाले आहेत.

रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यासह उपाध्यक्ष आणि विषय समितीच्या ४ सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्याचा विरोधकांचा डाव सत्ताधाऱ्यांनी हाणून पाडला आहे. सत्ताधारी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी सुरेश टोकरे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला आहे. सत्ताधाऱ्यांच्या या अफलातून खेळीने विरोधक चारी मुंडय़ा चीत झाले आहेत.

रायगड जिल्हा परिषदेत सध्या शेकाप-राष्ट्रवादी अशी युती आहे. गेली दीड वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश टोकरे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीचे शामकांत भोकरे हे आता अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. परंतु त्यांना अध्यक्षपदाने हुलकावणी दिली. टोकरे यांनाच पुढे अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय झाल्याने नाराज भोकरे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या सेनेच्या गोटात दाखल झाले. भोकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला नसला तरी त्यांच्या कारवाया लक्षात घेऊन त्यांच्याकडील पक्षप्रतोदपद राष्ट्रवादीने काढून घेतले.

आता भोकरे यांच्यासह सत्ताधारी गटातील काही सदस्यांना हाताशी धरून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे तसेच सर्व विषय समिती सभापतींवर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सेनेच्या गोटात सुरू होत्या. हा ठराव बारगळला तर पुन्हा वर्षभर तरी पुन्हा अविश्वास ठराव आणता येणार नाही. त्यामुळे सेनेच्या या हालचालींना सत्ताधाऱ्यांच्या खेळीने चांगलीच खीळ बसली आहे.

६२ सदस्य असलेल्या रायगड जिल्हा परिषदेत  अध्यक्षांवर अविश्वास ठराव पारीत करण्यासाठी ४२ सदस्यांची आवश्यकता आहे.

मात्र त्यांच्याकडे एवढे संख्याबळ नाही. त्यामुळे त्यांच्याकडून सत्ताधारी गटातील सदस्य फोडले जाण्याची शक्यता आहे. अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर त्यावरील चच्रेसाठी लवकरच विशेष सभा बोलावली जाणार आहे. त्यामुळे शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सदस्य लवकरच अज्ञातस्थळी रवाना होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी मुंबईतून ही सर्व मंडळी विमानाने टूरवर रवाना होतील.

जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर सत्ताधारी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांच्या सह्य़ा आहेत. त्यांच्यावर मनमानी कारभाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. आम्ही अविश्वास ठरावाला सामोरे जाऊ असे उत्तर अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Raigad district council