अलिबाग– रायगड जिल्ह्यातील १० हजार ०७५ शेतकरी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी सन्मान योजनेसाठी पात्र ठरले आहेत. आधार प्रमाणीकरण झाल्यावरच या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकणार आहे.जिल्ह्यातील १२ हजार ६८२ शेतकऱ्यांच्या थकीत कर्जांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. ज्यापैकी १० हजार ०७५ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. पहिल्या यादीत ७ हजार ३६८ लाभार्थ्यांची कर्जमाफीसाठी निवड झाली होती. दुसऱ्या यादीत १ हजार ३७४ शेतकरी पात्र ठरले होते. आता नव्याने प्रसिध्द करण्यात आलेल्या तिसऱ्या यादीत आणखिन १ हजार ३३४ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे अपलोड झालेल्या एकूण थकीत कर्जखात्यांपैकी जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांना थकीत कर्जदारांना या योजनेचा लाख भणार आहे. २ लाखांपर्यतचे कर्ज माफ केले जाणार आहे. तर दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना हेअर कट एसओपी प्रणालीचा लाभ दिला जाणार आहे.

मात्र यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या पुर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनाच कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांना जवळच्या सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक तनवीर पाटील यांनी केले आहे. योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतीमध्ये प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे,

या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जाची परतफेड न करू शकलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच, कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांकडून घेतलेल्या कर्जालाही या योजनेचा लाभ लागू होणार असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.