अलिबाग- रायगड जिल्ह्यात पावासाने कहर केला आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी २०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आहे. कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा आणि अंबा नद्यांनी धोका पातळी ओलांडल्याने, महाड, रोहा, नागोठणे, खोपोली, रसायनी, आपटा परिसरात पूरस्थिती आहे.

नागोठण्यात पूराचे पाणी….

नागोठण्यात सलग दुसऱ्या दिवशी पूरस्थिती आहे. अंबा नदीने धोका पातळी ओलांडल्याने, नागोठण्या पूराचे पाणी शिरले आहे. नदीची धोका पातळी ९ मीटर असून सध्या नदी १२.२० मीटरवरून वाहत आहे. त्यामुळे शहरातील मच्छीमार्केट, बस स्थानक, बाजारपेठ परिसराला पूराचा वेढा पडला आहे. सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षितस्थळी तातडीने स्थलांतरीत होण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे.

रोह्यातही पूरस्थिती…..

कुंडलिका नदीला पूर आल्याने रोह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी अष्टमी, रोहा शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. गेला दोन दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे कुंटलिका नदी धोका पातळीवरून वाहत आहे. कुंडलिका नदीची धोका पातळी २३ मीटर असून सध्या तीन २४.१० मीटरवून वाहत आहे. त्यामुळे रोहा शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे. रोहा शहरातील बाजारपेठ, दमखाडी, रायकर पार्क, बाजार पेठ येथे पाणी आहे. अष्टमी परिसरातही पूरस्थिती आहे. इथे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. रोहा शहरा नजिक असलेल्या भुवनेश्वर येथील काही भागात पाणी शिरले आहे. रोहा अष्टमीला जोडणाऱ्या जुन्या पूलावरून पाणी वाहत असल्याने, हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. रोहा कोलाड मार्गावरही तीन ठिकाणी पूराचे पाणी आले आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

सावित्रीला पूर आल्याने महाड मध्येही पूर…

महाबळेश्वर, पोलादपूर पट्टा आणि रायगड खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी रात्री सावित्री नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील सुकट गल्ली, मच्छी मार्केट, बाजारपेठ परिसरात रात्री पूराचे पाणी शिरले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली होती. दुकांनामधील सामानाना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी व्यापारी वर्गाचा आटोकाट प्रयत्न सुरू होता. दादलीपूल पाण्याखाली गेल्याने परिस्थिती बिकट झाली होती. प्रशासनाने भोंगे वाजवून नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. शहरातील नागरीकांनी त्यांची वाहने पूरापासून संरक्षण व्हावे यासाठी मुंबई गोवा महामार्गावर नेऊन ठेवली होती. सावित्री नदीची धोका पातळी ६.५० मीटर असून सध्या ती ७.६० मीटरवरून वाहत आहे.

पाताळगंगा नदीला पूर आल्याने खोपोलीत पाणीच पाणी….

लोणावळा, खोपोली परीसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पातळगंगा नदीला पूर आला आहे. नदीने धोका पातळी ओलांडल्याने खोपोली, रसायनी आणि आपटा परिसरातील सखल भागात पूरस्थिती आहे. शिळफाटा, शिलगाव, मस्जिद मोहल्ला, पटेल नगर परिसरात अनेक घरामध्ये रात्री पूराचे पाणी शिरले होते. पेण खोपोली रस्त्यावरही पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात आले होते. त्यामुळे रात्री वीज पूरवठा खंडीत करण्यात आला होता. नदीची धोका पातळी २१.५२ मीटर असून ती सध्या २१.५२ मीटरवर वाहत आहे.