अलिबाग: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मुंबई विभागात रायगड जिल्ह्याचा निकाल ९६.०३ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तूलनेत निकालाच्या टक्क्यात घट सव्वा टक्क्यांची घट झाली.

दहावीच्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून ३५ हजार ४७५ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी ३५ हजार २१७ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. यामधील ३३ हजार ४६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा निकाल ९५.०३ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घसरली आहे. ही एक चिंतेची बाब आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात ९६.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल पोलादपूर तालुक्याचा लागला. इथे ९७.६२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर सर्वात कमी निकाल हा तळा तालुक्याचा लागला. तिथे ८६.२९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी १६ हजार ९५९ मुले तर १६ हजार ५१० मुली परीक्षेत उतीर्ण झाले. मुलींच्या तुलनेत मुले उतीर्ण होण्याचे प्रमाण यंदा जास्त असल्याचे दिसून येत आहे. विशेष प्राविण्य श्रेणीत ८ हजार ६७९, प्रथम श्रेणीत १२ हजार ४०८, द्वितीय श्रेणीत ९ हजार ४१७, तर पास क्लास श्रेणीत २ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

सर्व यशस्वी विद्याथ्र्यांचे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारुद्र नाळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

तालुकानिहाय निकाल (टक्केवारी)

पनवेल ९५.९४, उरण ९४.८९, कर्जत ९६.९१, खालापूर ९२.१४, सुधागड ८९.९८, पेण ९३.७५, अलिबाग ९५.३५, मुरूड ९४.५९, रोहा ९४.३५, माणगाव ९४.५०, तळा ८६.२९, श्रीवर्धन ९२.१४, म्हसळा ९३.०६, महाड ९६.९६, पोलादपूर ९७.६२ टक्के.

  • जिल्ह्याचा एकुण निकाल ९५.०३ टक्के
  • गेल्या वर्षी लागलेला निकाल ९६.२५ टक्के
  • निकालात १.२२ टक्क्यांची घट