अलिबाग – रायगडच्या दक्षिण भागात आज सकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. महाड, माणगाव, पोलादपूर तालुक्यांमध्ये काही भागात ढगांच्या गडगडाटासह रिमझिम पाऊस बरसला. रायगड जिल्ह्यात तीन दिवसांसाठी अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय.
मागील दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र मळभ दाटून आले आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाट असा रिमझिम पाऊस बरसात होता. गेल्या काही दिवसांपासून टप्पा मानाचा पारा ४०°c च्या पुढे गेला होता. वाढत्या उष्णतेमुळे रायगडकर बेजार झाले होते. दुपारच्या वेळेस बाजारपेठा ओस पडत होत्या. वाढत्या उष्णतेमुळे बेजार झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मात्र अवकाळी पावसामुळे अंबा बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत. आधीच हवामानातील बदलांमुळे यावर्षी दहा ते पंधरा टक्के आंबा पिक हाती लागण्याची शक्यता आहे. अशातच आता अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हातात तोंडाशी आलेला पीक खराब होण्याची भीती बागायतदारांना आहे.
अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे वीट भट्टी व्यवसायिक धास्तावले आहेत. वीट भट्टी हंगाम सध्या जोरात सुरू आहे. अवकाळी पावसाचा या व्यवसायालाही फटका बसण्याची शक्यता आहे.
