अलिबाग- रायगड जिल्ह्यातील नद्या आंलेले पूर मंगळवारी ओसरले होते. त्यामुळे जनजिवन पूर्वपदावर येऊ लागले होते. मात्र नद्यांच्या पातळी बुधवारी सकाळी पून्हा एकदा वाढ झाली आहे. जिल्ह्यातील तीन प्रमुख नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने, जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत घट झाली होती.

रोहा, महाड, खोपोली परिसरातील पूरस्थिती ओसरली होती. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले होते. मात्र मंगळवारी संध्याकाळापासून जिल्ह्यात पावासाने पून्हा एकदा जोर धरला. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तुफान पाऊस सुरू झाला. त्यामुळे नद्यांच्या पातळीत पुन्हा एकदा वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. अंबा, कुंडलिका आणि सावित्री नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. तर पाताळगंगा नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांना पूराचा धोका निर्माण झाला आहे.

रोह्यातही पूरस्थिती…..

कुंडलिका नदीला पूर आल्याने रोह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी अष्टमी, रोहा शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे कुंटलिका नदी धोका पातळीवरून वाहत आहे. कुंडलिका नदीची धोका पातळी २३ मीटर असून सकाळी सहा वाजता २४.४० मीटर होती. त्यामुळे रोहा शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. रोहा अष्टमीला जोडणाऱ्या जुन्या पूलावरून पाणी वाहत असल्याने, हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

सावित्रीला पूर आल्याने महाड मध्येही पूर…

महाबळेश्वर, पोलादपूर पट्टा आणि रायगड खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सावित्री नदीने पुन्हा एकदा धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील सुकट गल्ली, मच्छी मार्केट, बाजारपेठ परिसरात रात्री पूराचे पाणी शिरले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. सावित्री नदीची धोका पातळी ६.५० मीटर असून सकाळी सहा वाजता तीची पातळी ७.६२ मीटर होती.

अंबा नदीलाही पूर….

सुधागड पाली आणि रोहा परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे अंबा नदीला पूर आला आहे. सलग तिसऱ्या दिवशी नदी धोका पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे नागोठणे परिसरात पूरस्थिती आहे. जिल्ह्यातील सखल भागात पूराचे पाणी शिरले आहे. नदीची धोका पातळी ९ मीटर असून सकाळी सहा वाजता ती १०.३५ मीटरवरून वाहत होती. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.