मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे दैदिप्यमान कार्य आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा वैभवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने किल्ले रायगड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘गडगर्जना’ या सांस्कृतिक कार्यक्रमावर तब्बल २५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त २६ आणि २७ जून रोजी झालेल्या या कार्यक्रमासाठी झालेल्या खर्चाला आता राज्य सरकारने वित्तीय मान्यता दिली आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाने ३ सप्टेंबर रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार ‘गडगर्जना’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी झालेला २५ लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी कार्यक्रमाच्या आयोजनास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष झालेल्या खर्चास वित्तीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने यासाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर सरकारने हा खर्च मंजूर केला.
नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांच्या स्वराज्यनिर्मितीचा इतिहास आणि महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व समजावे, या उद्देशाने ‘गडगर्जना’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक उपक्रमातून इतिहास आणि संस्कृतीची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मंजूर झालेला खर्च ‘कला व संस्कृती’ या लेखाशीर्षाखालील राज्य कला संस्कृती जनन, संवर्धन, विविध महोत्सव तसेच इतर कार्यक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या तरतुदीतून भागविण्यात येणार आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी मंजूर असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून ही रक्कम खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कार्यक्रमासाठी वितरित करण्यात आलेल्या निधीच्या विनियोगानंतर एक महिन्याच्या आत कार्यक्रमाच्या खर्चाचा सविस्तर तपशील आणि उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला सादर करण्याची जबाबदारी सांस्कृतिक कार्य संचालनालयावर सोपविण्यात आली आहे. तसेच वित्त विभागाने घालून दिलेल्या अटी व नियमांनुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
कार्यक्रम आधीच पार पडला असताना त्यावरील २५ लाख रुपयांच्या खर्चाला आता वित्तीय मान्यता देण्यात आल्याने या खर्चाचा तपशील आणि निधीचा प्रत्यक्ष विनियोग कसा आहे याकडेही लक्ष लागले आहे.
