Raigad Fort Pre-wedding Shoot: किल्ले रायगडावर प्री-वेडींग शूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवरायांच्या समाधीस्थळावर प्रीवेडींग शूट केल्याचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. याबाबत कारवाईची मागणी केली जात असताना आता महिला व बालविकास मंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, दोषींवर कारवाईची आदेश दिले आहेत.
कारवाईची सूचना
छत्रपती शिवाजी महाराज यांचे समाथीस्थळ असलेल्या किल्ले रायगडावर प्री-वेडींग शूट केल्याप्रकरणी शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून संबधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. महिला व बालविकास मंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी याप्रकरणाची दखल घेऊन कारवाईचे आदेश दिलेत. मंत्री तटकरे यांनी रायगडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्याची सूचना दिल्या आहेत. तसेच, रायगडावर प्री वेडिंग शूट, फोटो शूट, वैयक्तिक कार्यक्रम करू नयेत असे सूचना फलक लावण्याची सूचनाही पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दिली आहे.
काय म्हणाल्या आदिती तटकरे?
किल्ले रायगड येथे प्री-वेडिंग फोटोशूट केल्याचा प्रकार निंदनीय असल्याचे मत मंत्री तटकरे यांनी व्यक्त केले. या घटनेबद्दल मी स्वतः रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे व पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशा सूचना दिल्या आहेत, असे तटकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
रायगडावर मार्गदर्शक फलक
पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी डॉ. अभिजित आंबेकर यांच्यासोबतही संवाद साधून किल्ले रायगडाचे पावित्र्य जपण्यासाठी तातडीने मार्गदर्शक सूचनांची रचना करावी अशा सूचना दिल्या आहेत, असे तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. तटकरे यांनी याप्रकरणी रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबतही चर्चा केल्याचे सांगितले. किल्ले रायगड येथे कोणत्याही प्रकारचे प्री वेडिंग शूट, फोटो शूट, वैयक्तिक कार्यक्रम करू नयेत असे सूचना फलक दर्शनी भागांमध्ये लावण्याबाबत जिल्हा स्तरावर व शासन स्तरावर योग्य कार्यवाही करण्याबाबत त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली, असे त्यांनी सांगितले.
घटनेबाबत संताप
समाधीस्थळ परिसरात २४ तास पोलीस तैनात असतात, असे असूनही हे छायाचित्रण कसे करण्यात आले.. पुरातत्व विभागाकडून या छायाचित्रिकरणाला कशी परवानगी देण्यात आली असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी देखील या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यात सहभागी असणाऱ्यांवर भारतीय पुरातत्व विभागाने कठोर कारवाई करायला हवी, त्याच बरोबर असे प्रकार पुन्हा घडणार नाही याची दक्षता घ्यायला हवी असे निर्देश तटकरे यांनी पूरातत्व विभागाला दिले आहेत.
