राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज किल्ले रायगडाला भेट देणार आहे. या पार्श्वभुमीवर पाचाड आणि रायगड परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. रायगडाकडे जाणारे सर्व रस्ते पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पोलीस बंदोबस्तासह, एसपीजी कमांडोजही तैनात करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापुर्वी माजी राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांनी १९८५ साली किल्ले रायगडाला भेट दिली होती. त्यानंतर राष्ट्रपती कोविंद रायगडावर येणारे दुसरे राष्ट्रपती असणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर रायगड परीसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> Video: हाच स्वर्ग अन् हीच आमची राजधानी… रायगडावरील मुसळधार पावसाचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ पाहिलात का?

अडीच हजार पोलीस अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा दलाचे कमांडो, राज्य राखीव दल, शिघ्र कृती दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दुपारी १२ वाजता राष्ट्रपती हेलिकॉप्टरने पाचाड येथे दाखल होणार आहे. तेथून रोपवेने ते रायगड किल्ल्यावर जाणार आहेत.

राष्ट्रपती कोविंद राजसदरेवर महाराजांच्या सिंहासनावरुढ पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. यानंतर होळीचा माळ आणि शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाला राष्ट्रपती भेट देणार आहेत. राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी रायगडावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणाऱ्या मेघडंबरीला फुलांची विशेष सजावट करण्यात आलीय. तसेच रायगडावर रेड कार्पेट अंथरण्यात आल्याचं दिसत आहे. अडीच हजार पोलीस, रेड कार्पेट, फुलांची सजावट, एनएसजी कमांडो अशी सर्व तयारी प्रशासनाने या दौऱ्याच्या निमित्ताने केलीय.

तीन तारखेपासून पर्यटकांना प्रवेशबंदी…
तीन डिसेंबर २०२१ ते सात डिसेंबर २०२१ दरम्यान किल्ले रायगडबरोबरच रायगड रोप-वेही पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच यासंदर्भातील पत्रक जारी केलं होतं. रायगडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रोड तसेच नातेगाव ते पाचड मार्ग सुद्धा सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं.

मोदींनीही दिलेली भेट….
यापूर्वी ५ जानेवारी २०१४ रोजी त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी रायगडाला भेट दिली होती. सांगली येथील शिव प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महानगड ते रायगड या पायी मोहिमेचा समारोप रायगड किल्ल्यावर झाला. याच कार्यक्रमासाठी मोदी उपस्थित होते. शिवरायांना अभिवादन करून त्यांनी उपस्थित जनसभेला संबोधित केलं होतं. पुणे विमानतळावरून सकाळी हेलिकॉप्टरने मोदी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील हेलिपॅडवर उतरले होते. मोदी यावेळी प्रथमच रायगडच्या दौऱ्यावर आले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad fort preparation as president ramnath kovind visit the fort to pay his respect to chhatrapati shivaji maharaj scsg
First published on: 06-12-2021 at 08:56 IST