अलिबाग : रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी वापरण्यात येणारी रोपवे सेवा जवळपास दोन महीने बंद होती. देखभाल, दुरुस्ती आणि आवश्यक सुरक्षा तपासण्यांसाठी ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे रायगड किल्ल्यावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र रोप वे सेवे संदर्भात महत्वाचे अपडेट समोर आले आहेत.

दरवर्षी लाखो पर्यटक रायगड किल्ला पाहण्यासाठी भेट देतात. गडावर काही मिनिटांत पोहोचता यावे यासाठी रोपवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, सुरक्षितता आणि सेवा अखंडित राहावी यासाठी नियोजित तांत्रिक तपासण्या व देखभाल केली जाते. त्यासाठी ही सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीपासून ही सेवा होती. त्यामुळे गडावर जाणाऱ्या पर्यटकांना पायपीट करत जावे लागत होते. ज्यात अबाल वृध्दांची मोठी अडचण होत होती.

दुरुस्ती, उपकरणांची तपासणी आणि सुरक्षा मानकांची पडताळणी करण्यासाठी ही सेवा बंद ठेवली गेली होती. मात्र मंगळवार दिनांक ३ नोव्हेंबर पासून ही सेवा पुन्हा एकदा सुरू केली जाणार आहे. रायगड रोप वे कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र खातू यांनी ही माहिती दिली आहे.

सुरवातीला रोपवे सेवा १६ नोव्हेंबर पासून पुन्हा सुरु करण्यात येईल, असे व्यवस्थापनाने सांगीतले होते. मात्र देखभाल पूर्ण झाल्यानंतर ३ नोव्हेंबर पासूनच ही सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे ही सेवा अधिक सुरक्षित, सुरळीत आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम झाली असल्याचा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत किल्ले रायगडावर येणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. खासकरून जेष्ठ नागरीकांनी आणि हृदय विकार असलेल्यांनी पायरी मार्गाचा वापर करतांना विशेष काळजी घेणे आवश्यक होते. कारण खडतर असल्याने गडावर चढून जाणे आव्हानात्मक ठरत होते. आता रोप वे सेवा सुरु होणार असल्याने, जेष्ठ नागरीकांची गैरसोय टळणार आहे.

पायरी मार्गाने गडावर चढून जाण्यासाठी एक ते दीड तासांचा कालावधी लागत होता. आता रोप वे मार्गाने गडावर पाच ते सात मिनटात जाता येणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांचा वेळही वाचणार आहे.