अलिबाग– किल्ले रायगडावरील टकमक टोकावरून स्वतःचा कडेलोट करत एका तुरणाने आपले जीवन संपविले. सुयोग पांचाळ असे या तरुणाचे नावे आहे. पोलीसांनी स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने त्याचा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढला.मिळालेल्या माहितीनुसार, घरी वाद झाले म्हणून ३७ वर्षीय सुयोग पांचाळ हा तरुण शनिवारी ठाण्यातील घरातून रागाच्या भरात घरातून बाहेर पडला. खेडकडे जाण्यास निघाला. मात्र खेडला न जाता किल्ले रायगडावर पोहोचला. त्यानंतर त्याने आपल्या घरी फोन करून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितलं. गडावरील काही फोटो घरच्यांना पाठवले आणि फोन बंद केला. तेव्हा पासून तो बेपत्ता होता. त्याचा मोबाईल बंद होता.
सुयोगशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे धास्तावलेल्या कुटुबीयांनी तातडीने रायगडाच्या पायथ्याशी धाव घेतली. तिथे सुयोगची दुचाकी आढळून आली. मात्र त्याचा दिसून आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस, स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन बचाव पथकाने तात्काळ रायगडावर धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत सुयोगचा शोध घेतला गेला. मात्र, रात्री झालेला प्रचंड अंधार, दाट धुके आणि टकमक टोकाखालील दरीची अत्यंत धोकादायक परिस्थिती लक्षात घेता शोधकार्य सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरते थांबवण्यात आले होते.
रविवारी सकाळी उजाडताच बचाव पथकाने पुन्हा एकदा मोहिमेला सुरुवात केली. दरीचा अथांग विस्तार आणि खोल दरीचा अंदाज घेण्यासाठी आधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेण्यात आली. ड्रोनच्या माध्यमातून शोध घेत असताना निजामपूरच्या दिशेला ८०० फूट खोल दरीत युवकाचा मृतदेह आढळून आला. बचाव पथकांनी खोल दरीत उतरून त्याचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या ठिकाणी मृतदेह आढळला, तिथे अतिशय घनदाट झाडी आणि अत्यंत तीव्र उतार आहे. दरीची खोली आणि कड्यांची रचना यामुळे खाली उतरणे आणि मृतदेह सुरक्षितपणे बाहेर आणणे धोक्याचे बनले आहे. बचाव पथकांकडून हे काम सुरू आहे या दुर्दैवी घटनेमुळे रायगड परिसरात आणि शिवप्रेमींमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. महाड तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
