अलिबाग: किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दि. ३० व ३१ मे २०२६ या दोन दिवसांसाठी रायगड किल्ल्यावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी जारी केले आहेत.
निर्णय का?
यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार ६ जून तर तिथीनुसार २६ जून रोजी साजरा होणार असून, राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर शिवभक्त तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी व्यवस्थापन आणि संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.
मार्ग प्रकल्प विभाग, महाड (विशेष पथक रायगड किल्ला) यांच्या माहितीनुसार, २०२३ मधील शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी महादरवाजाखालील उंच कड्यावरून दगड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर यंदाच्या सोहळ्यापूर्वी धोकादायक व सैल दगड हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई यांच्या प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने ३० आणि ३१ मे रोजी राबविण्यात येणार आहे. या कामादरम्यान पायी मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होऊ नये म्हणून पायरी मार्ग पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी यांचे निर्देश काय ?
जिल्हा प्रशासनाने कार्यकारी अभियंता, मार्ग प्रकल्प विभाग, महाड आणि दुर्गवीर प्रतिष्ठान यांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना चित्त दरवाजा, नाणेदरवाजा आणि शिर्काई मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, या कालावधीत रायगड रोपवे सेवा नियमित सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रायगड किल्ल्यावर दरवर्षी तारीख आणि तिथी प्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला जातो यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्त गडावर दाखल होत असतात अशावेळी पायरी मार्गाने येणारे पर्यटकांच्या आणि शिवभक्त यांच्या जीवाला धोका होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून गडावरील सैल झालेले दगड काढले जातात. गडाचा पायरी मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवला जातो. पावसाळ्यात रायगड परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. कमी वेळात जास्त पाऊस झाल्यास डोंगर माथ्यावरील सैल झालेली माती आणि दगड गोटे दरडींच्या स्वरूपात खाली कोसळण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपत्ती व्यवस्थापनाची कामे हाती घेतली जातात.
