अलिबाग- रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळूनही, महायुतीमधील शिवसेना राष्ट्रवादी मधील वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. दोन्ही पक्षात शाब्दीक चकमकी सुरूच आहेत. महत्वाची बाब म्हणजे दिवसेंदिवस टिकेची पातळी घसरत चालली आहे.

जवळपास दीड वर्षाच्या टोकाच्या संघर्षानंतर रायगडचे पालकमंत्रीपद अखेर शिवसेनेकडे सोपविण्यात आले. राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले. यानंतर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील वादाला पूर्णविराम मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र पालकमंत्रीपदाचा तिढा सुटूनही दोन्ही पक्षांमधील वाद थांबण्याची शक्यता दिसत नाही.

अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरे कुटूंबिया विरोधातील आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही तटकरे यांनी शिवसेनेला अध्यक्षपद मिळू दिले नव्हते. आमदार दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. पण अध्यक्षपद भाजपला गेल्याने, दळवी यांच्या अध्यक्ष होण्याच्या अपेक्षावर पाणी फेरले गेले. त्यानंतर आमदार दळवी यांची कन्या जुईली दळवी हीला विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदारसंघातून महायुतीची उमेदवार म्हणून संधी मिळावी यासाठी आमदार दळवी आग्रही होते. पण तटकरे यांनी आपला राजकीय अनुभव पणाला लावून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मिळवली. जुईली दळवी यांना निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडले. अनिकेत तटकरे यांना बिनविरोध निवडून आणले. यामुळे आमदार दळवी चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे पालकमंत्री पद शिवसेनेला मिळूनही त्यांनी तटकरे यांच्या विरोधातील आक्रमकतेची धार कमी होऊ दिलेली नाही.

आमदार अनिकेत तटकरे हे सरोगसी बाळ असल्याची टिप्पणी दळवी यांनी माध्यमांशी संवाद साधतांना केली. शिवसेनेच्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली नसती तर अनिकेत तटकरे आमदारच झाले नसल्याची टीका दळवी यांनी केली. यानंतर अनिकेत तटकरे यांनी दळवींवर निशाणा साधला. दळवी यांनी सरोगसी हा शब्द आधी नीट लिहून दाखवावा, असे आवाहन त्यांनी दिले. दळवींच्या वक्तव्यातून त्यांची संस्कृती दिसून येते. आमदार दळवी त्यांच्या पत्नीला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळावे यासाठी दिल्लीपर्यंत आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी फेऱ्या मारत होते असा दावाही केला. त्यामुळे दोन्ही पक्षातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. एकमेकांवर टिकाटिप्पणी करतांना टिकेचा स्तरही खालावू लागला आहे.

दरम्यान तटकरे कुटूंब आणि दळवी यांच्यातील हा वाद वैयक्तिक टिका टिप्पणी पुरता मर्यादीत राहतोय, की त्याचे व्यापक पडसाद जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उमटणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.