अलिबाग- पावणे दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला, भरत गोगावले यांची रायगडच्या पलकमंत्री पदाची सुत्र सोपविण्यात आली. मात्र जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचा मुहूर्त मिळालेला नाही. जिल्हा नियोजन समितीचे गठनही होऊ शकलेले नाही.
महायुतीमधील अंतर्गत मतभेदामुळे रायगडचे पालकमंत्रीपद जवळपास पावणे दोन वर्ष रिक्त ठेवण्यात आले होते. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद यास कारणीभूत होते. अनेक प्रयत्न करूनही दोन्ही पक्षातील संघर्ष थांबत नव्हता. पण विधानपरिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत शिवसेना शिंदे गटाने माघार घेत अनिकेत तटकरे यांना बिनविरोध निवडून दिले. यानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने रायगडच्या पलाकमंत्रीपदावरील दावा सोडला आणि भरत गोगावले यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजातील मोठा अडसर दूर होईल अशी अपेक्षा होती.
मात्र गोगावले यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती होऊन दोन महिने होत आले तरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला मुहूर्त मिळालेला नाही. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होऊ शकलेली नाही. तर दुसरीकडे जिल्हा नियोजन समितीचे गठनही झालेले नाही. पालकमंत्र्यांकडून समितीवर नियुक्त केल्या जाणाऱ्या निमंत्रित सदस्यांची नियुक्तीही झालेली नाही.
रायगड जिल्ह्यासाठी सन २०२६ – २७ या वर्षासाठी ५१७ कोटींच्या जिल्हा विकास आराखड्य़ाला राज्यसरकारने मजूरी दिली होती. यातील ६० टक्के निधी उपलब्ध झाला आहे. म्हणजेच राज्य सरकारकडून ३१७ कोटी २० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहेत. मात्र जिल्हा नियोजन समितीची बैठकच झाली नसल्याने, जिल्हा विकास आराखड्यातील विकास कामांना मंजूरी देता आलेली नाही. त्यामुळे निधी जिल्हा नियोजन विभागाकडेच पडून आहे. त्यामुळे पालकमंत्री भरत गोगावले जिल्हा नियोजन समितीची बैठक कधी घेणार याकडे रायगडकरांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा नियोजन समिती का महत्वाची?
राज्यसरकारच्या आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांसाठी आलेल्या निधीतून होणाऱ्या कामांवर देखरेख ठेवण्याचे काम या समिती मार्फत केले जाते. याशिवाय जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त होणाऱ्या निधीतून कामांना मंजूरी देणे आणि ती कामे विहीत वेळेत पुर्ण करून घेणे यावर देखरेख ठेवणे, वार्षिक आराखडा तयार करण्याचे कामही समितीच्या माध्यमातून केले जाते.
पालकमंत्री महोदयांनी वेळ दिली की लगेच जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलावण्यात येईल, येत्या दोन ते तीन दिवासात ते वेळ कळवणार आहेत. – उमेश सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी
