मुंबई: सरकार स्थापन होऊन वर्ष उलटले तरी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. रायगडमधील पालकमंत्री पदावरून शिवसेना (शिंदे) मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार) मंत्री अदिती तटकरे यांच्यातील वाद कायम आहे. यामुळे निदान ध्वजवंदनाची संधी तरी मिळावी म्हणून आग्रही असलेल्या भरत गोगावले यांची अखेर इच्छापूर्ती झाली आहे. यंदा प्रजासत्ताकदिनी रायगड जिल्हा मुख्यालयात त्यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे.

रायगडचे पालकमंत्रीपद जाहीर झाले नसले तरी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन जवळ आला की तटकरे आणि गोगावले यांच्यात वादाची ठिणगी पडते. पालकमंत्रीपदाचा स्थगिती देण्यात आली तरी महाराष्ट्र दिन आणि स्वातंत्र्यदिनी आदिती तटकरे यांना झेंडावंदनाची संधी देण्यात आली होती. यामुळे गोगावले अस्वस्थ होते. त्यांनी आपली ही नाराजी बोलूनही दाखवली.

१५ ऑगस्ट रोजी मुख्यालयावर ध्वजारोहणाची संधी न मिळाल्याने त्यांनी रायगडमधील बिरवाडी ग्रामपंचायतीत जाऊन ध्वजारोहण केले होते. प्रजासत्ताकदिनाला काही दिवस असताना त्यांनी पुन्हा एकदा आपली इच्छा बोलून दाखवली. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण व्हावे ही जनतेची इच्छा आहे, मात्र वरिष्ठांचा निर्णय आम्हाला मान्य करावा लागतो, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.

गोगावले इच्छा अखेर पूर्ण झाली असून सामान्य प्रशासन विभागाने आज याबाबतचा शासननिर्णय जारी केला आहे. प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाचवेळी म्हणजे सकाळी सव्वा नऊ वाजता आयोजित केला जातो. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत शिवाजी पार्क येथे प्रमुख समारंभामध्ये ध्वजवंदन कार्यक्रम होईल.

विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पालकमंत्री, मंत्री किंवा राज्यमंत्र्याच्या हस्ते ध्वजवंदन होईल. त्याची यादी शासननिर्णयामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत रायगड जिल्ह्यासमोर भरत गोगावले यांचे नाव आहे. गोगावले व तटकरे वादात अशाप्रकारे मध्य साधत सरकारकडून दोन्ही बाजू सावरून धरण्यात आल्या आहेत. गोगावले यांची इच्छापूर्ती औटघटकेची ठरेल, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

रायगडप्रमाणेच नाशिकध्येही पालकमंत्रीपदावर अद्याप निर्णय झालेला नाही. तिथेही महायुतीतील तिन्ही पक्षात वाद आहेत. आतापर्यंत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनीची ध्वजारोहण केले आहे. यावेळीही त्यांच्यावरच ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी शर्यतीत असलेले शिवसेनेचे (शिंदे) मंत्री दादा भुसे अमरावतीत ध्वजवंदन करतील.

राजशिष्टाचार विभागाच्या  परिपत्रकानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  पुणे जिल्ह्यात, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यात, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अहिल्यानगर जिल्ह्यात, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते  यांच्या हस्ते बीड  जिल्ह्यात तर सांगलीत चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल.

जिल्हा आणि ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे

पालघर:  गणेश नाईक, जळगाव:  गुलाबराव  पाटील, अमरावती: दादाजी  भुसे, यवतमाळ:  संजय राठोड, मुंबई शहर : मंगल प्रभात लोढा, रत्नागिरी:  उदय सामंत, धुळे:  जयकुमार रावल, जालना:   पंकजा मुंडे, नांदेड: अतुल सावे, चंद्रपूर: डॉ.अशोक उईके, सातारा:  शंभुराज  देसाई, मुंबई उपनगर:  ॲड.आशिष  शेलार, वाशिम:  दत्तात्रय भरणे,  लातूर: शिवेंद्रसिंह भोसले, नंदुरबार: योगेश कदम , सोलापूर: जयकुमार गोरे, हिंगोली: नरहरी झिरवाळ, भंडारा: संजय  सावकारे, छत्रपती संभाजीनगर:  संजय शिरसाट, धाराशिव: प्रताप  सरनाईक, बुलढाणा: मकरंद  जाधव (पाटील), सिंधुदुर्ग: नितेश राणे, अकोला: आकाश फुंडकर, कोल्हापूर:  प्रकाश आबिटकर, गडचिरोली:  ॲड.आशिष  जयस्वाल, वर्धा:  डॉ. पंकज भोयर आणि परभणी:   मेघना दीपक  साकोरे-बोर्डीकर, गोंदिया-इंद्रनील नाईक