अलिबाग- रायगड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने शंभरी गाठली, जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ९ वाजे पर्यंत संपलेल्या २४ तासात सरासरी ११० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान आणखिन दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदीकिनाऱ्यावरील तसेच डोंगर उतारावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनूसार महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीदरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून मध्य-ट्रोपोस्फेरिक द्रोणीय रेषा कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा दरम्यान पसरली आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या कालावधीत जिल्ह्यातील नद्या, ओढे आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता असून सखल भागात पाणी साचणे, पूरसदृश परिस्थिती निर्माण होणे तसेच घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच प्रवास करण्यापूर्वी रस्त्यांची व वाहतुकीची अद्ययावत माहिती घेऊनच प्रवास करावा असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाने केले आहे. अरबी समुद्रात समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी पुढील सूचना मिळेपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी भातशेती व भाजीपाला रोपवाटिकांमध्ये अतिरिक्त पाण्याचा तातडीने निचरा करावा. तसेच मुसळधार पावसाच्या काळात जनावरे सुरक्षित गोठ्यात ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.जिल्हा प्रशासनाने नागरिकांना हवामान विभाग, जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना व इशाऱ्यांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात आज शाळा आणि महाविद्यालये नियमित सुरू आहेत. अतिवृष्टीमुळे आंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्राला आज मोठे उधाण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरतीच्या वेळी पावसाचा जोर कायम राहिला तर नागोठणे परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील कुंठलिका, सावित्री, पाताळगंगा, भोगावती, काळ आणि उल्हास नद्याच्या पाणी पातळीत वाढ झाली असली तरी त्या इशारा पातळीपेक्षा कमी पातळीवर आहेत.
कुठल्या तालुक्यात किती पाऊस पडला?
जिल्ह्यात सरासरी ११०.५ मिलीमीटर पावसाची नोंद
दि. ३ जुलै २०२६, सकाळी ९.०० वाजेपर्यंत
अलिबाग – ९८ मिमी
मुरूड – ११३ मिमी
पेण – १५० मिमी
पनवेल – ११६.२ मिमी
उरण – १२५ मिमी
कर्जत – ७२ मिमी
माथेरान – ११७ मिमी
खालापूर – ७२ मिमी
रोहा – ९८ मिमी
सुधागड – ११९ मिमी
माणगाव – ८८ मिमी
तळा – १३७ मिमी
महाड – ८९ मिमी
पोलादपूर – १०५ मिमी
श्रीवर्धन – १४५ मिमी
म्हसळा – १२५ मिमी
एकूण पर्जन्यमान : १७६९.४ मिमी
सरासरी पर्जन्यमान : ११०.५ मिमी
