अलिबाग- रायगड जिल्ह्याला गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दरड कोसळून ३ जण जखमी झाले आहेत. जुलै महिन्याच्या सुरवातीपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे अंबा, सावित्री, कुंडलिका, पाताळगंगा, भोगावती, बाळगंगा नद्यांची पाणी पातळी सतत वाढत आहे.

त्यामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ५५ ठिकाणी दरडी कोसळल्या. यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्तहानी झाली. जिल्ह्यात गेल्या सात दिवसात ११ जणांचा अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला. ज्यात पनवेल तालुक्यात ४, कर्जत तालुक्यात ३, महाड तालुक्यात २, तर अलिबाग आणि तळा तालुक्यातील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे यात वर्षासहली जीवावर बेतण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे.

तळा तालुक्यातील फळशेत कर्नाळा येथील वेदन जनार्दन भोसले याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. दिघोटी पनवेल येथील मच्छिंद्र गणपत गावंड, आपटा येथील प्रज्वल प्रदीप कांबळे, वाघाचीवाडी येथी सुमित यशवंत पवार यांचा बूडून मृत्यू झाला. खारघर येथील अश्रफ सद्दाम शेख याचा खेकडे पकडतांना बुडून मृत्यू झाला.

कर्जत तालुक्यातील नेरळ येथे टपालवाडी धबधब्यात पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या आरबीन जाहीरउद्दीन शेख यांचा बुडून मृत्यू झाला आहे. कर्जत तालुक्यातील बेडीसगाव येथे भगीरथ धबधब्यावर ओकार संतोष साहू याचा तर भागुची वाडी येथे मासेमारीसाठी गेलेलल्या नामदेव वाळकू पारधी याचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला.

महाड येथे कांबळे बिरवडी येथे पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून सुधीर सुंदर देशमुख यांचा मृत्यू झाला तर कुसगाव येथे मासेमारीसाठी गेलेला सुहेल सलीम शेख याचा बुडून मृत्यू झाला. अलिबाग मध्ये वेळवली खानाव येथील चांगु कमळू घरत यांचा पूलाला पडलेल्या भगदाडात पडल्याने मृत्यू झाला. या शिवाय दरड कोसळून तीन जण जखमी झाले आहेत.त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात पूरस्थिती असतांना अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडणे टाळा, तसेच अतिवृष्टीच्या काळात वर्षासहली टाळाव्या असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.