अलिबाग– रायगड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी २०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात महाड, रोहा, नागोठणे, खोपोली, रसायनी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. रस्ते वाहतूक कोलमडली. जिल्ह्यात २५ ठिकाणी दरडी कोसळल्या, अतिवृष्टीत तिघांचा मूत्यू झाला. तर पाच जण बेपत्ता असल्याची माहीती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

शनीवारी पाठोपाठ रविवारीही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडला. त्यामुळे कुंडलिका, सावित्री, पाताळगंगा आणि अंबा नद्या धोका पातळीवरून वाहत होत्या. अंबा नदीने धोका पातळी ओलांडल्याने, सलग दुसऱ्या दिवशी नागोठणे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. कुंडलिका नदीने धोका पातळी ओलांडल्याने, रोहा शहर, अष्टमी परिसराला पूराचा तडाखा बसला. महाबळेश्वर पोलादपूर आणि रायगडच्या खोऱ्या झालेल्या मुसधारपावसाने सावित्री नदीला पूर आला. त्यामुळे महाड शहरातील सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली. खोपोलीत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाताळगंगा नदीने धोका पातळी ओलांडली. त्यामुळे खोपोली शहरातील सखल भागात पूरस्थिती उद्भवली.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात २५ ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. ज्यात तीन जण जखमी झाले. दरडीमुळे ७३ घरांचे लहान मोठ्या स्वरूपात नुकसान झाले. या घटनानंतर दरडप्रवण आणि नदी किनाऱ्यांवरील १४ गावांमधील २६५ कुटूंबातील ९३७ नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात आत्ता पर्यंत ८४ घरांची पडझड झाली आहे. तर २४२ हून अधिक घरांना १२ दुकानांना पूराचा तडाखा बसला आहे.

जिल्ह्यात पाण्यात वाहून गेल्याने अथवा बुडाल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. एक जण जखमी आहेत. तर अन्य पाच जण बेपत्ता आहेत. स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने त्यांचा शोध सुरु आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे. मुंबई पुणे दृतगती महामार्ग, मुंबई पुणे जुना महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग, पेण खोपोली महामार्ग, खोपोली पाली महामार्गावरील वाहतुक अतिवृष्टीमुळे प्रभावित झाली आहे. अंबेनळी घाट, वरंधा घाट यांच्यापाठोपाठ ताम्हिणी घाटातील वाहतूकही रस्ता खचल्याने ठप्प झाली आहे.  कोकण रेल्वेची वाहतूक मात्र सुरळीत सुरू आहे.