अलिबाग- रायगड जिल्ह्यात ७३ हजार ३६५ हजार हेक्टरवर यंदा खरीपाच्या लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यात प्रामुख्याने भात आणि नागली पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात भाताची आणि नाचणी पिकाची उत्पादकता वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी शुक्रवारी दिले.
रायगड जिल्ह्यात ९१ हजार ५२१ एवढे भात लागवडीचे क्षेत्र आहे. पण गेल्या वर्षी ७० हजार ४४६ हजार हेक्टरवर भात लागवड करण्यात आली होती. यावर्षी ७३ हजार २६५ हेक्टरवर खरीपाची लागवण करण्याचे उद्दीष्ट आहे. यंदा लागडवड क्षेत्र ३ हजार हेक्टरने वाढवण्याचे उद्दीष्ट कृषी विभागाने ठेवले आहे.
गेल्या वर्षी प्रती हेक्टरी उत्पादकता २ हजार ०८१ किलोग्रँम होती. यावर्षी त्यात २ हजार ९९५ किलो ग्रॅम वाढ करण्याचे उद्दीष्ट अपेक्षित आहे. जिल्ह्यात २ हजार ८११ हेक्टर नाचणी लागवडीखालील क्षेत्र आहे. यापैकी गेल्या वर्षी २ हजार ४९१ हेक्टरवर नाचणीची लागवड करण्यात आली होती. यंदा २ हजार ५५० हेक्टरवर नाचणी पेरणीचे लक्षांक कृषी विभागाने ठेवला आहे.
यंदाच्या खरीप हंगामासाठी १६ हजार ९५० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. यात १६ हजार क्विंटल सुधारीत तर ६० क्विंटल संकरीत भात बियाण्याचा समावेश आहे. महाबिज आणि इतर खाजगी कंपन्याकडून हे बियाणे उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नियोजन पूर्ण झाले आहे. यापैकी ३ हजार क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.
खरीप हंगामासाठी १४ हजार टन खतांची मागणी शासनाकडे रायगड जिल्हा कृषी विभागाने केली आहे. यात ११ हजार टन युरीया, ७०० टन डिएपी, १५०० मेट्रीक टन मिश्र खतांचा समावेश आहे. कृषी निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात आली आहेत.
दरम्यान, औद्योगीकीकरण आणि शहरीकरण यामुळे शेतीक्षेत्र घटत असले तरी शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे पिकांची उत्पादकता वाढवण्यावर भर द्या असे निर्देश रोजगार हमी आणि फलोतत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी यावेळी कृषी अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कृषी सभापती वैकुंठ पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, कृषी अधीक्षक वंदना शिंदे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नाविन्यपूर्ण पिकांची लागवडीचे प्रयोग होणार
नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत यावर्षी जिल्ह्यात मिरी, दालचिनी, सुरण आणि मशरुम तथा मटकी या पिकांची लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.या शिवाय मागेल त्याचा काजू रोपे उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले जाणार असल्याची मागणी यावेळी देण्यात आली.
