अलिबाग: कोकणात पर्यटनासाठी लाखो पर्यटक सध्या दाखल होत झाले आहेत. मात्र पर्यटनासाठी आलेल्या या पर्यटकांना दुहेरी कोंडीला सामोरे जावे लागत आहेत. एकीकडे वाहनांच्या गर्दीमुळे ठिकठीकाणी वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. तर दुसरीकडे सीएनजी टँकर चालक अचानक संपावर गेल्याने, सीएनजी मिळतांना पर्यटकांचा तासंतास खोळंबा होत आहे.
संपाचा फटका
रायगड जिल्ह्यातील सीएनजी टँकर चालक संघटनेने पुकारलेल्या संपाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांसह कोकणात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनाही बसू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक सीएनजी पंप पूर्णपणे बंद पडले आहेत. परिणामी वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे.
उन्हाळी सुट्ट्या आणि पर्यटन हंगामामुळे सध्या रायगड आणि कोकण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी आहे. मुंबई, पुणे आणि इतर शहरांतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक खासगी वाहनांद्वारे कोकणात दाखल होत आहेत. यातील अनेक वाहने सीएनजीवर चालणारी असल्याने प्रवासादरम्यान इंधन उपलब्ध न झाल्याने अनेक पर्यटक अडचणीत सापडले आहेत. काही ठिकाणी वाहनधारकांना पर्यायी इंधनाचा वापर करावा लागत असून, अनेकांना प्रवासाचे नियोजन बदलावे लागले आहे.
कोकणात सुट्ट्यांसाठी आलेले चाकरमानी देखील सीएनजी अभावी रस्त्यात अडकून पडल्याचे चित्र दिसत आहे. ज्या काही पंपांवर मर्यादित प्रमाणात सीएनजी उपलब्ध आहे, त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक वाहनधारकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.
सीएनजी संपाचा परिणाम कसा?
या संपाचा सर्वाधिक परिणाम स्थानिक रिक्षाचालकांवर झाला आहे. रायगडमधील बहुतांश रिक्षा सीएनजीवर चालत असल्याने इंधन उपलब्ध नसल्यामुळे अनेक रिक्षाचालकांना आपला व्यवसाय बंद ठेवावा लागत आहे. ऐन पर्यटन हंगामात धंदा ठप्प झाल्याने रिक्षाचालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
टँकर चालकांच्या मागण्या कोणत्या?
दरम्यान, सीएनजी टँकर चालक संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा बंद पुकारला आहे. भविष्य निर्वाह निधीची सुविधा, किमान २५ हजार रुपये मासिक वेतन, विमा संरक्षण, तसेच ड्युटीची वेळ निश्चित करणे अशा प्रमुख मागण्यांचा यात समावेश आहे. प्रशासन आणि संबंधित कंपन्यांनी आपल्या न्याय मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी संपकरी चालकांनी केली आहे.
