अलिबाग – मातीसाठी पोखरण्यात येणारे डोंगर…, डोंगर माथ्यावर व पायथ्याशी करण्यात येणारी बांधकामे…, बेसुमार वृक्षतोड…, अनियंत्रित पाऊस यामुळे रायगड जिल्ह्यात दरड कोसळून अपघात होऊ शकणाऱ्या संभाव्य दरडग्रस्त गावांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील दहा वर्षात दरडीपासून धोका असलेल्या गावांची संख्या १०३ वरुन ३९२ पर्यंत वाढली आहे.
जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या मार्फत रायगड जिल्ह्यातील संभाव्य दरडग्रस्त गावांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येते. भूवैज्ञानिकांनी केलेल्या पाहणीनंतर संभाव्य दरडग्रस्त गावांची यादी प्रसिद्ध केली जाते या ठिकाणी प्रशासनामार्फत सतर्कतेचे आदेश दिले जात असतात. पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर अशा दोन टप्प्यात डोंगरा लागत असलेल्या गावांचे सर्वेक्षण केले जाते. यामुळे पावसाळ्यात दरडीपासून उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून नागरिकांचे संरक्षण करता यावे यासाठी सूचना दिल्या जातात. आपत्ती उद्भवल्यास कोणत्या उपाययोजना करण्यात याव्या, यादृष्टीने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला जात असतो.
दरडींचा धोका असलेल्या गावात मधील नागरिकांचे तात्पुरते अथवा कायमस्वरूपी स्थलांतरण केले जाते. त्रिस्तरीय राबविला जात असतो. यात जिल्हास्तर तालुका स्तर आणि ग्रामीण पातळीवरील आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा समावेश असतो.
रायगड जिल्ह्यात दरडीमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या अन्य नैसर्गिक आपत्तींपेक्षा सर्वाधिक आहे. याशिवाय दरडी कोसळून रहदारी विस्कळित होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. दरडी कोसळण्यानंतर मदतकार्य राबवण्यापेक्षा आपत्ती येण्यापूर्वी उपाययोजना केल्यास होणारे नुकसान टाळता येणे शक्य आहे. यासाठी जिल्हा प्रशासन गांभिर्याने काम करीत आहे. पावसाळयात संभाव्य नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतर्फे अँक्शन प्लॅन तयार करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यात यापूर्वी घडलेल्या घटना
रायगड जिल्ह्यात यापूर्वी दरड कोसळून मोठी जिवीतहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. २६ जुलै २००५मध्ये आलेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील दासगाव, रोहन, जुई, कोंडिवते, अप्पर तुडील या गांवासंह पोलादपूर तालुक्यातील कुडपण, कोंढवी, कोतवाल या गावांमध्ये दरडी कोसळण्याची घटना घडली होती. यामध्ये जवळपास ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २२ जून २०१५ रोजी नेरळ मोहाची वाडी येथे दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. २१ व २२ जुलै २०२१ रोजी महाड येथे तळिये गावात दरड कोसळून ८४ जणांचा मृत्यू झाला. पोलादपूर तालुक्यातील केवनाळे येथे भूस्खलन होऊन ५ जण दगावले. तर साखर सुतारवाडी येथील दरड दुर्घटनेत ६ जणांचा जीव गेला. तीन वेगवेगळ्या दुर्घटनांत एकूण ९५ जणांचा बळी गेला. २८ जण जखमी झाले. याशिवाय आंबेमाची, हिरकणी वाडी, मोहोत, वाघेरी, सवाद, माटवण, डाभीळ येथील शेकडो कुटुंब विस्थापित झाल्याची दुर्घटना घडली होती.
जिल्ह्यातील दरडग्रस्त गावे
रायगड जिल्ह्यात दरड कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असलेली ३९२ गावे असून, सर्वात जास्त १४० गावे पोलादपूर तालुक्यात आहेत. तर महाड १२१, रोहा २०, म्हसळा १४, माणगाव २२, पनवेल ३, खालापूर १२, कर्जत ५, सुधागड ९, श्रीवर्धन १२, तळा ३, अलिबाग ९, मुरुड ९, पेण १३ गावे दरडग्रस्त आहेत.
