अलिबाग– लोणेरे हत्याकांडातील आरोपीला अटक करण्यात रायगड पोलीसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला अखेर यश आले आहे. शनिवारी रात्री आरोपी अनिस मोहम्मदखान मालदार याला ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.

माणगाव तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय तरुणीची लैंगिक अत्याचार करून अतिशय क्रुर पणे हत्या केली आली होती. विवस्त्र अवस्थेत तीचा मृतदेह लॉजवरील खोलीत टाकून दिला होता. रक्ताच्या थारोळ्यात मृतमुलीचे हातपाय बांधून ठेवण्यात आले होते. त्यामुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहीतेतील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार पोलीस पथकांच्या मदतीने रायगड सह, रत्नागिरी, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात आरोपीचा शोध सुरू होता. मात्र सहा दिवस आरोपी आरोपीला सुगावा लागत नव्हता. त्यामुळे पोलीस तपासाबाबत नाराजी होती.

तपासा दरम्यान आरोपीवर यापुर्वीही खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीसांनी त्या गुन्ह्याच्या माहिती संकलित केली. त्यानंतर तांत्रिक आणि गोपनिय माहितीच्या आधार आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा तो गेल्या चार दिवसांपासून ठाणे शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात लॉजवर राहत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. पोलीसांनी रात्रीच ठाण्यातील लॉजेसची तपासणी सुरू केली. एका लॉज वर डॉरमॅटरी रुम मध्ये आरोपी आढळून आला. पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले.

त्याला अटक करून रविवारी अलिबाग येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ३० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा पुढील तपास महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे तपास करत आहेत. आरोपीच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्ये पोलीस निरीक्षक मिलंद खोपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, भास्कर जाधव यांच्या पथकांनी महत्वाची भूमिका बजावली.