अलिबाग – वीजबिल न भरता अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्यांविरोधात महावितरणने आता कारवाईचा धडाका सुरू केला आहे. रायगड जिल्हयातील कर्जत आणि खालापूर तालुक्यात राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत तब्बल ३१ ग्राहकांकडून सुमारे ५२ हजार युनिटची वीजचोरी उघडकीस आली आहे. या वीजचोरीची किंमत तब्बल १५ लाख रुपयांच्या आसपास असल्याने महावितरणच्या कारवाईने परिसरातील वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
भांडुप परिमंडलाच्या वतीने वीजचोरीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून ७ आणि ८ ऑगस्ट रोजी कर्जत व खालापूर तालुक्यातील वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. खोपोली आणि कर्जत उपविभागातील विविध ठिकाणी विशेष पथकांनी अचानक तपासणी करत वीज वापराची पाहणी केली.
या कारवाईदरम्यान विशेषतः हॉटेल्स, फार्म हाऊस तसेच इतर वीज ग्राहकांच्या जोडण्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये मीटरमध्ये फेरफार, अनधिकृत जोडणी अथवा अन्य मार्गाने वीजचोरी होत असल्याचे आढळून आलेल्या ३१ ग्राहकांविरोधात भारतीय विद्युत अधिनियम, २००३ मधील कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली.
वीजचोरी आढळलेल्या ग्राहकांना नियमानुसार वीजचोरीची बिले देण्यात आली आहेत. ही बिले निर्धारित मुदतीत न भरल्यास संबंधितांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही केली जाणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ही कारवाई मुख्य अभियंता, भांडुप परिमंडल संजय पाटील आणि अधीक्षक अभियंता, पेण मंडळ धनराज बिक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पनवेल ग्रामीण विभागात विशेष वीजचोरीविरोधी पथके तयार करण्यात आली असून, या पथकांच्या माध्यमातून संशयित वीज जोडण्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
कारवाईमध्ये पनवेल ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता दिवाकर देशमुख, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय ठाकूर, उपकार्यकारी अभियंते वाघमोडे, केंद्रे आणि राख यांच्यासह सहाय्यक अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.दरम्यान, वीजचोरीचा थेट परिणाम वीज वितरण व्यवस्थेवर होत असून, त्यातून तांत्रिक आणि वाणिज्यिक वीजहानी वाढते. त्याचा अप्रत्यक्ष भार नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवरही पडतो. त्यामुळे वीजचोरी रोखण्यासाठी अशा मोहिमा अधिक तीव्र करण्याची भूमिका महावितरणने घेतली आहे.
“वीजचोरी ही केवळ महावितरणची आर्थिक हानी नाही, तर त्याचा परिणाम प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांवरही होतो. कर्जत आणि खालापूर परिसरात वीजहानीचे प्रमाण लक्षात घेता वीजचोरीविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्यात आली आहे. अनधिकृतपणे वीज वापरताना कोणी आढळल्यास नियमाप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल,”- संजय पाटील मुख्य अभियंता
