अलिबाग- नगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्या आहेत. पालकमंत्र्यांची नियुक्तीही झाली आहे. आता पुढील तीन वर्ष निवडणुका नाहीत, त्यामुळे अंतर्गत मतभेद आणि वाद विसरून विकासाला प्राधान्य द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले. ते अलिबाग येथे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील, प्रतोद अमित नाईक, हर्षल पाटील, आणि चारुहास मगर उपस्थित होते. महायुती मधील अंतर्गत मतभेद आणि नाराजी बाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, त्यांनी हे आवाहन केले. भरत गोगावले यांची पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यावर त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आमच्यात कुठलेही वाद नाही. लोकसभा निवडणूकीला अवधी आहे. तेव्हा निवडणुकीला कसे सामोरे जायचे याचा निर्णय यथा अवकाश होईलच. पण तोवर जिल्ह्याच्या विकास कामांना गती देण्याची संधी आहे. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांनी आता एकत्र येऊन जिल्ह्याच्या विकासाला गती द्यायला हवी असा सल्ला त्यांनी दिला.
कर्जत खालापूर मधील रेल्वे पूलांच्या कामाचे श्रेय घेण्यावरून खासदार श्रीरंग बारणे यांनी नुकतीच एका जाहीर कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली होती. माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नका असा सल्ला बारणे यांनी दिला होता. याबाबत विचारणा केली असता, श्रीरंग बारणे हे माझे चांगले मित्र आहेत. आमच्यात कोणतेही वाद नाही. जिल्ह्यातील विवीध विकास कामांसाठी लोक मला भेटतात. त्यामुळे रायगड जिल्ह्याशी निगडीत विषय असल्याने मी त्याबाबतचा पाठपुरावा करतो. त्यामुळे त्यांच्या श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
रेवस रेड्डी मार्गावरील पूलांच्या जोड रस्त्यांना गती द्या….
दरम्यान खासदार तटकरे यांनी रेवस रेड्डी सागरी मार्गावरील विवीध कामांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी या मार्गावरील पुलांच्या कामांची सद्यस्थिती आणि भुसंपादनातील अडचणी याचा माहिती घेतली. यात भुसंदापनास होत असलेल्या उशीराबाबत, प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे तटकरे यांनी सांगितले. कुठल्याही परिस्थिती भुसंदापनाची कामे लवकर मार्गी लावा, त्यासाठी प्रशासकीय अडचणी दूर करण्याचे निर्देश यंत्रणांना दिल्याचे तटकरे यांनी सांगितले. रेवस रेड्डी मार्गाच्या पुढील कामांना लवकर गती देण्याच्या सूचनाही केल्याचे सांगितले.
पेण आणि रोहा रेल्वे स्थानकांचा विकास होणार
रोहा आणि पेण रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात येणार असून, अगदी विमानतळाच्या धर्तीवर ही स्थानके विकसित केली जातील, त्यासाठी रोहा स्थानकाची निविदा येत्या काही दिवसात प्रसिध्द होईल, त्यानंतर पेण स्थानकाचे कामाची निविदा काही दिवसांनी प्रसिध्द होईल अशी माहिती तटकरे यांनी दिली. कोकण रेल्वे मार्गावरील प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याची कामेही हाती घेण्यात आली आहेत. गोरेगाव स्थानकातील प्लॅट फॉर्मची उंची वाढविण्याचे काम सुरू झाले असून, नागोठण्याचे कामही लवकरच हातील घेतले जाईल असे तटकरे यांनी सांगितले.
