अलिबाग: रायगड जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी एक घटना समोर आली आहे. माणगाव तालुक्यातील खरवली येथील आदिवासी वाडीवर राहणाऱ्या एका महिलेनी तिच्या चार निष्पाप मुलांवा थंड पेयातून विष देऊन स्वतःही विषप्राषन करून आत्महत्या केली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेमुळे माणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महिलेने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माणगाव जवळील खरवली आदिवासी वाडीवर ही घटना घडली. आशा जाधव या २९ वर्षीय महिलेने बाजारातून थंड पेय आणले. त्यात कुठले तरी विषारी औषध मिसळले, नंतर ते आपल्या चार लहान मुलांना पिण्यासाठी दिले. नंतर स्वतःही ते प्राशन केले.
थंडपेय प्यायल्यानंतर काही वेळातच मुलांना आणि आईला उलट्यांचा त्रास होऊ लागला. हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने महिलेसह चारही लहान मुलांना उपचारासाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मात्र रुग्णालयात उपचार सुरू असतांनाच विषबाधेमुळे महिलेचा आणि दोन मुलींचा मृत्यू झाला. इतर दोन मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. आशा जाधव वय २९, नंदिनी जाधव वय ७ आणि दुर्वा जाधव वय ६ या तिघांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. तर विषबाधेत बचावलेल्या इतर दोन मुलांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांना वाचविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी शर्तीचे प्रयत्न करत आहेत
घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. मृत महिलेचे नातेवाईक आणि तीचा पती यांच्याकडून महिती घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
