अलिबाग – म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी आज पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेचे शाहीद जंजिरकर यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत शिवसेना शिंदे गटाने काँग्रेसच्या मदतीने नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्तापित केले. त्यामुळे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना मोठा धक्का बसला आहे.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे शाहिद जंजिरकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेडगे यांचा पराभव केला. जंजिरकर यांना ९ मते मिळाली, तर राष्ट्रवादीला केवळ ६ मतांवर समाधान मानावे लागले. गेली दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या म्हसळा नगरपंचायतीवर आता शिवसेनेचा भगवा फडकला. निकालानंतर शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजय साजरा केला.

म्हसळा नगर पंचायतीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. म्हसळा नगर पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता होती मात्र अंतर्गत संघर्षामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षांसह सात नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये संघर्षाची ठिणगी पडली. या सात नगरसेवकांना अपात्र ठरवावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले. या अपिलावर निर्णय देताना जिल्हाधिकारी यांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत या सातही नगरसेवकांना अपात्र ठरवले.

दरम्यानच्या काळात म्हसळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली. जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला या अपात्र नगरसेवकांनी नगर विकास विभागाकडे अपील करत आव्हान दिले. नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यावरील सुनावणी पार पडली यात जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली. त्यानंतर आज झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे शाहिद जंजिरकर नगराध्यक्ष पदी विराजमान झाले. हा निकाल राष्ट्रवादी काँग्रेस आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासाठी जिव्हारी लागणारा आहे. या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद पुन्हा उफाळून शक्यता आहेत.