अलिबाग- रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा तडाखा बसला. आंबा नदीने धोका पातळी ओलांडली. कुंडलिका नदीही दिवसभर इशारा पातळीवरून वाहत होती. माणगाव जवळ मुंबई गोवा महामार्गावर पाणी आले होते. तर पुणे आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या वरंध घाटात दरड कोसळली.
सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पावसाने शंभरी गाठली, जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ९ वाजे पर्यंत संपलेल्या २४ तासात सरासरी ११० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात वृक्ष उन्मळून पडणे, वीज पूरवठा खंडीत होणे आणि सखल भागात पाणी शिरणे यासारखा घटना घडल्या. सतंतधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली.
आंबा नदीने गेली दोन दिवस इशारा पातळीवरून वाहत होती. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास नदीने धोका पातळी ओलांडली. नदीची धोका पातळी ९ मीटर असून ती दिवसभर ९.२० मीटरवरून वाहत होती. त्यामुळे नागोठणे परिसरातील सखल भागात पूराचे पाणी शिरण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे नागोठणे बाजारपेठ आणि सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. पण सुदैवाने दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला आणि भरती ओसरण्यास सुरुवात झाल्याने, पूराने उग्र रूप धारण केले नाही.
कुंडलिका नदीनेही सकाळी १० वाजता इशारा पातळी ओलांडली होती. त्यामुळे रोहा शहर आणि नदी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला होता. महाबळेश्वर आणि पोलादपूर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली होती. माणगाव जवळ मुंबई गोवा महामार्गावर पावसाचे पाणी आल्याने, या परिसरातील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.
महाड परीसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वरंध घाटात मोठी दरड कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत जिवीत हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथके आणि यंत्रणा वरंध घाटात दाखल झाल्या. त्यांनी तातडीने घाटात आलेला दगड माती आणि झाडांचा ढिगारा बाजूला केला आणि दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरळीत केली.
जिल्ह्यात सरासरी ११०.५ मिलीमीटर पावसाची नोंद
दि. ३ जुलै २०२६, सकाळी ९.०० वाजेपर्यंत
अलिबाग – ९८ मिमी
मुरूड – ११३ मिमी
पेण – १५० मिमी
पनवेल – ११६.२ मिमी
उरण – १२५ मिमी
कर्जत – ७२ मिमी
माथेरान – ११७ मिमी
खालापूर – ७२ मिमी
रोहा – ९८ मिमी
सुधागड – ११९ मिमी
माणगाव – ८८ मिमी
तळा – १३७ मिमी
महाड – ८९ मिमी
पोलादपूर – १०५ मिमी
श्रीवर्धन – १४५ मिमी
म्हसळा – १२५ मिमी
एकूण पर्जन्यमान : १७६९.४ मिमी
सरासरी पर्जन्यमान : ११०.५ मिमी
