अलिबाग : रायगड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली असून, या महिन्यात सरासरीच्या केवळ ५९.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. मात्र, जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसामुळे ऑगस्टमधील तूट भरून निघाली आहे. ऑगस्टअखेर जिल्ह्यात एकूण वार्षिक पर्जन्यमानाच्या ८५.७ टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील २८ प्रकल्पांपैकी २१ धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, या प्रकल्पांमध्ये ९६.९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

‘एल निनो’च्या सावटामुळे रायगड जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, जुलै महिन्यात पावसाने जून महिन्याची कसर भरून काढली. जुलैच्या पहिल्या दहा दिवसांत विक्रमी पाऊस झाला. त्यानंतरही पावसात फारसा खंड पडला नाही.रायगड जिल्ह्यात दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ३ हजार १४८.६ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा जून आणि जुलै या दोन महिन्यांत जिल्ह्यात २ हजार ९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी ६५५ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा जूनमध्ये केवळ ३३५ मिलिमीटर पाऊस झाला. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत ५१ टक्के पावसाची नोंद झाली. त्यानंतर जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल १६१ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जून महिन्यातील पावसाची तूट जुलैमध्ये भरून निघाली.मात्र, ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने दडी मारली. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी ८७४.५ मिलिमीटर पाऊस पडतो. त्या तुलनेत यंदा ५१८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. म्हणजेच ऑगस्टमध्ये सरासरीच्या केवळ ५९.३ टक्के पाऊस झाला.रायगड जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३ हजार १४८.६ मिलिमीटर आहे. ऑगस्टअखेर जिल्ह्यात २ हजार ६९७.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ८५.७ टक्के पाऊस झाला आहे.

उरण तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, तेथे सरासरीच्या १२६.१ टक्के पाऊस झाला आहे. अलिबागमध्ये १०३.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. इतर तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, श्रीवर्धन तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे ७३.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

२८ धरणांमध्ये ९६.९५ टक्के पाणीसाठा

पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील २८ प्रकल्पांपैकी २१ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. चार धरणांमध्ये ९९ टक्के, तर एका धरणात ९५ टक्के पाणीसाठा आहे. श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले आणि रानीवली ही दोन धरणे अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. सर्व २८ प्रकल्पांमध्ये एकूण ९६.९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

तालुकानिहाय पावसाची टक्केवारी
तालुका
पाऊस (टक्के)
अलिबाग
१०३.६
पनवेल
९७.९
कर्जत
८१.३
खालापूर
८९.६
उरण
१२६.१
सुधागड
८६.४
पेण
९१.३
महाड
९४.६
माणगाव
९४.८
रोहा
८९.०
पोलादपूर
८४.०१
मुरूड
९५.३
श्रीवर्धन
७३.६
म्हसळा
७५.५
तळा
९१.४