अलिबाग – रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिकासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. ३४ नगराध्यक्षपदाच्या तर ५७५ नगरसेवक पदांच्या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. जिल्ह्यात सायंकाळी साडे पाच वाजे पर्यंत सरासरी ७०.२६ टक्के मतदान झाले.
जिल्ह्यातील अलिबाग, पेण, मुरुड जंजिरा, रोहा, श्रीवर्धन, महाड, उरण, खोपोली, कर्जत, माथेरान नगरपालिकांमध्ये मंगळवारी मतदान झाले . १० नगराध्यक्षपदासाठी ३४ तर नगरसेवकाच्या २०९ जागांसाठी ५७५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते . या सर्वांचे राजकीय भवितव्य मंगळवारी मतदान यंत्रात बंद झाले आहे. मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे हे पाहण्यासाठी २० दिवस वाट पहावी लागणार आहे.
माथेरान नगरपालिकेसाठी सर्वाधिक मतदान झाले. इथे ८५.३५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर सर्वात कमी मतदान श्रीवर्धन नगरपालिकेसाठी झाले. इथे ६६.२३ टक्के मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यातील इतर नगरपालिकांच्या तुलनेत इथे मतदारांमध्ये निरुस्ताह पहायला मिळाला.
जिल्ह्यात दहा नगरपालिकामध्ये २ लाख ३७ हजार मतदार होते. यापैकी १ लाख ६६ हजार ८५८ मतदारांनी मतदान केले. ८३ हजार ९८६ पुरुष , ८२ हजार ८७१ महिला तर इतर एकाने मतदानाचा हक्क बजावला. कर्जत येथे ७२.३७ टक्के, अलिबाग ७०.३१ टक्के, मुरुड जंजिरा ७३.८९ टक्के, खोपोली ६८.५२ टक्के , उरण ६७.९२ टक्के, पेण ७०.३९ टक्के, महाड ७१.०३ टक्के आणि रोहा ७१.९२ टक्के मतदान झाले.
मंगळवारी सकाळी साडे सात वाजल्या पासून १० नगरपरिषदामध्ये मतदान प्रक्रिया सुरू झाली. सकाळी मोजक्याच केंद्रांवर थंडीतही उत्साह दिसून आला. मात्र दुपारनंतर खऱ्या अर्थाने केंद्रावर रांगा पहायला मिळाल्या. दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्ह्यात १० नगरपरीषदांमध्ये ५५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. महाड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत तुफान राडा झाला, कार्यकर्त्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड करण्यात आली. उरण मध्ये बोगस मतदान करण्यावरून भाजप आणि शिवसेनेत वाद झाला.
रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते भिडले. कर्जतमध्ये मतदान यंत्रे बंद पडली. त्यामुळे अनेक मतदार मतदान न करताच परतले, याबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. अलिबाग, श्रीवर्धन, खोपोली, महाड येथेही मतदान यंत्र बंद पडली. अलिबाग, रोहा, श्रीवर्धन येथे मतदान केंद्रांत मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मतदान यंत्र बदल्या नंतर मतदान सुरु करण्यात आले. माथेरान मध्ये पाच लाखांची रोकड जप्त करण्यात आली. जिल्ह्यात अन्य ठिकाणी बाचाबाचीच्या तुरळक घटना घडल्या.
