अलिबाग- चुलत भावाची हत्या करणाऱ्या आरोपीला माणगाव सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला. रविंद्र सोनू जगताप असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

सदर घटना तळा तालुक्यातील मजगाव बौद्धवाडी येथे १६ फेब्रुवारी २०१९ ला घडली होती. आरोपी रविंद्र सोनू जगताप आणि त्याचे काका हिरामण जगताप यांच्यात नारळाची झाडे तोडल्यावरून वाद झाला होता. या वादानंतर हिरामण जगताप यांच्या पत्नीने आरोपी रविंद्र जगताप यास शिविगाळी केली होती. याच रागातून आरोपी रविंद्र याने मुंबईहून गावात आलेल्या हिरामण जगताप यांचा मुलगा दिपक याचा चाकू आणि कोयत्याने पोटावर आणि खांद्यावर वार करत हत्या केली.

हेही वाचा – “जर विशाल पाटील खात्री देणार असतील की…”, उद्धव ठाकरेंचं सांगली निवडणुकीबाबत मोठं विधान; म्हणाले, “जे झालं ते…”!

हेही वाचा – सांगली : महाविद्यालयास जात असताना तरुणीवर हल्ला

या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात भादवी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांची तपास करून माणगाव सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांच्या न्यायालयासमोर झाली. यावेळी शासकीय अभियोक्ता म्हणून जितेंद्र म्हात्रे यांनी काम पाहिले. सुनावणी दरम्यान प्रत्यक्षदर्शी, तपास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि इतर साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने शासकीय अभियोक्ता यांचा युक्तीवाद ग्राह्य धरला, आणि आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.