अलिबाग- रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दिव्यांग कल्याण आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. कौस्तुभ दिवेगावर यांच्याकडून त्यांनी तात्काळ पदभार स्विकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वीच सत्यजित बडे यांची भारतीय प्रशासकीय सेवेत (आय.ए.एस.) निवड झाली होती. त्यामुळे त्यांची प्रशासकीय बदली होणार हे निश्चित होते. आता याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ते पुणे येथील महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण आयुक्त पदावर कार्यरत असणार आहेत. बडे यांची महाराष्ट्र विकास सेवेत सन २००० मध्ये निवड झाली होती. तेव्हापासून आजतागायत त्यांनी विविध ठिकाणी गट विकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदी विविध पदांवर काम केले आहे.
सन १९७३ मध्ये कोल्हापूर येथे सत्यजीत बडे यांचा जन्म झाला. पुणे येथील गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्थेमधून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. यानुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेद्वारे त्यांची सन २००० मध्ये विकास शाखेत गटविकास अधिकारी/ उपमुख्य कार्यकारी अधिकारी या संवर्गात निवड झाली.
सत्यजित बडे यांनी सन २००२ ते २००७ या कालावधीत आंबेगाव आणि त्यानंतर सांगली जिल्ह्यातील वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून काम केले आहे. सन २०१३ ते २०१७ या कालावधीत ते पुणे जिल्हा परिषदेचे तर सन २०१७ ते २०१९ या कालावधीत सातारा जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सन २०१९ मध्ये त्यांची विकास शाखेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गात निवड झाली आणि या निवडीनंतर त्यांची वर्धा जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली. सन २०२२ पर्यंत त्यांनी वर्धा जिल्हा परिषदेत काम केले. सन २०२३ पासून ते रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. नुकतीच त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली होती.
बडे यांना सन २०१२ मध्ये ग्रामविकास विभागांतर्गत देण्यात येणारा ‘यशवंत गुणवंत अधिकारी’ हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळालेले सर्वात कमी वयाचे ते पहिले अधिकारी आहेत. याशिवाय त्यांनी यशवंत पंचायतराज अभियानामध्ये उल्लेखनीय कामकाज केलेले आहे. शिवाय राज्य सरकारमार्फत गठीत करण्यात येणाऱ्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले आहे. रायगड जिल्ह्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळताना ग्रामीण विकासाच्या दृष्टीने बडे यांचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे.

