अलिबाग : सरत्‍या वर्षाला निरोप देण्‍याबरोबरच नववर्ष स्‍वागताचा आनंद लुटण्‍यासाठी पर्यटक मोठया संख्‍येने रायगडात दाखल झाले आहेत. ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रायगड सज्ज झाले आहे. कुठेही अनुचित प्रकार होऊनये यासाठी रायगड जिल्‍हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणाने देखील खबरदारी घेतली आहे.बीच पेट्रोलींगचे नियोजन करण्‍यात आले आहे. पार्ट्यांवर पोलिसांचा वॉच राहणार आहे. वाहतूक कोंडी होऊनये यासाठी रायगड जिल्ह्यातील काही मार्गांवर ३१ डिसेंबर रोजी अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.

राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाने परवाने आतापर्यंत २३ पार्टी परवाने मंजुर केले आहेत. कायदा सुव्‍यवस्‍था राखण्‍याच्‍या दृष्‍टीने पोलीस यंत्रणेने आवश्‍यक ती खबरदारी घेतली आहे.पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी सर्व पोलीस ठाण्‍याच्‍या प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून आढावा घेतला व आवश्‍यक त्‍या उपाय योजना करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या आहेत. समुद्र किनारी टवाळखोर मुले फिरणार नाहीत, दारू पीत बसणार नाहीत यासाठी सागरी सुरक्षा दलाला सोबत घेवून बीच पेट्रोलींगचे नियोजन करण्‍यात आले आहे.

रात्रीच्‍या वेळी समुद्र किनारी नववर्ष स्‍वागतासाठी मोठी गर्दी होत असते. यात महिला आणि मुलींची संख्‍याही मोठी असते. त्‍यांची छेडछाड होवू नये यासाठी दामिनी पथक सक्रिय झाले असून त्‍यांचीदेखील गस्‍त राहणार आहे. दारू पिवून गाडी चालवण्‍याचे प्रकार बरयाच ठिकाणी घडतात. त्‍यातून अपघात होण्‍याची भीती असते. हे लक्षात घेवून पर्यटन स्‍थळी गस्‍तीवर असणारया पोलीस पथकांकडे ब्रेथ अॅनालायझर उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहेत. पहाटेपर्यंत नाकाबंदी सुरू राहणार असून यात दारू पिवून गाडी चालवणारयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

पर्यटकांच्‍या वाढत्‍या संख्‍येमुळे रस्‍त्‍यावर वाहनांची वर्दळदेखील वाढणार आहे. त्‍यामुळे वाहतूक कोंडीची शक्‍यता दाट असणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापूर तर अलिबाग वडखळ मार्गावर पेझारी ही हमखास वाहतूक कोंडीची ठिकाणे आहेत. माणगाव आणि इंदापूर येथे जादा पोलीस बंदोबस्‍त तैनात असेल. शिवाय रायगड पोलीस आणि महामार्ग पोलीस यांच्‍या समन्‍वयाने वाहतूक कोंडी टाळण्‍यासाठी प्रयत्‍न केले जाणार आहेत. तर अलिबाग वडखळ मार्ग नो ओव्‍हरटेकिंग झोन जाहीर करण्‍यात आला आहे.

जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येणार आहेत. स्थानिक नागरिक व पर्यटक यांचा प्रवास सुखकर व्हावा व अपघात तळावेत यासाठी रायगड जिल्ह्यातील काही मार्गांवर ३१ डिसेंबर रोजी अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. खारपाडा ते कशेडी (मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66), माणगांव-ताम्हाणी घाटमार्गे दिघी (रा.मा. क्र. 753-फ), कर्जत-पळसदरी-खोपोली-पालीफाटा-वाकण (रा.मा. क्र. 584-अ), वडखळ-अलिबाग (रा.मा. क्र. 166-अ), चौक फाटा-कर्जत राज्यमार्ग, अलिबाग-मुरुड राज्यमार्ग व अलिबाग-मांडवा या महामार्ग व राज्यमार्गांवरून ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ते ते १ जानेवारी२०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक बंदी केली आहे.

थर्टीफर्स्‍ट आणि नववर्ष स्‍वागतासाठी येणारया पर्यटकांची असुविधा टाळण्‍यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्‍यक ती खबरदारी घेतली आहे. सर्व प्रभारी अधिकाऱ्यांच्‍या बैठका घेवून त्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे. अनुचित प्रकार करणारयांवर कठोर कारवाई केली जाईल. पर्यटक आणि स्‍थानिकांनी दुसऱ्याला त्रास न होता नववर्ष स्‍वागताचा आनंद घ्‍यावा. – आंचल दलाल, पोलीस अधिक्षक रायगड