अलिबाग : अनियमीत आणि अनियंत्रित पावसामुळे खरीप हंगामातील भात शेती संकटात सापडली आहे. आधी लांबलेल्या पावसामुळे तर नंतर अतिवृष्टीमुळे भात शेती अडचणीत सापडली आहे. अर्धा जूलै सरला असला तरी भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात एकूण लागवड क्षेत्राच्या केवळ १.६७ टक्के क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. पावसाने दडी दिल्याने भात लागवड संथगतीने सुरू आहे.
रायगड जिल्ह्यात जवळपास ९० हजार हेक्टर भात लागवडीखालील क्षेत्र आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या लागवड क्षेत्रात सातत्याने घट होत चालली आहे. यास वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरण कारणीभूत ठरले आहे. यंदा त्यात निसर्गाच्या लहरीपणाची भर पडण्याची चिन्ह दिसत आहेत. गेल्या वर्षी जवळपास ७१ हजार हेक्टरवर भात लागव़ड करण्यात आली होती. यावर्षी तेवढ्या क्षेत्रावरही भात लागवड होईल की नाही याबाबत साशंकता आहे.
निसर्गाचा लहरीपणा यास कारणीभूत ठरला आहे. जून महिन्याचे पहिले तीन आठवडे जिल्ह्यात पाऊस पडला नाही. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पावसाला सुरूवात झाली, त्यामुळे शेतीच्या कामांना गती मिळाली होती. पण जुलै महिन्याच्या पहिल्या आठ दिवसात जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. ठिकठिकाणी पूरस्थिती उद्भवली त्यामुळे जवळपास २ हजार १०० हेक्टर वरील भाताच्या रोपवाटीका नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून ७५ टक्के अनुदानातून बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे. १४ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ९१ हजार ५२०.७२ हेक्टर सरासरी भात क्षेत्रापैकी केवळ १ हजार ५२७.४९ हेक्टर (१.६७ टक्के) क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २.१३ टक्के क्षेत्रावर लागवड झाली होती. त्यामुळे यंदा भात लागवड गेल्या वर्षाच्या तुलनेतही मागे असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
तालुकानिहाय पाहता उरण तालुक्यात सर्वाधिक २४.४६ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. त्याखालोखाल सुधागडमध्ये ६.५९ टक्के आणि तळा तालुक्यात ५.९४ टक्के लागवड झाली आहे. तर पोलादपूर, मुरूड, कर्जत, पनवेल आणि महाड या तालुक्यांमध्ये लागवडीचे प्रमाण अत्यल्प आहे.ही एक चिंताजनक बाब आहे.
जिल्ह्यात १० जुलैपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लागवड करता आलेली नसून, पाणी ओसरल्यानंतरच पुनर्लागवडीला वेग येणार आहे. कृषी विभागाच्या मते, पुढील काही दिवस हवामान अनुकूल राहिल्यास जिल्ह्यातील भात लागवडीचा वेग वाढण्याची अपेक्षा आहे. पण पावसाचा अनियमितपणा असाच सुरू राहीला तर मात्र यंदा भात लागवडीखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत आणखिन घट होण्याची शक्यता आहे.
