अलिबाग- वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी रायगड पोलीसांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. फसवणूकीसाठी आणि अफरातफरीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘म्यूल अकाऊंट्स‘ विरोधात पोलीसांनी व्यापक मोहीम कारवाईला सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसात तब्बल २३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या वापरण्यात आलेल्या खात्यांच्या माध्यमातून ३५ कोटींची अफरातफर झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
देशभरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. नवनवीन मार्ग आणि क्लुप्त्या शोधन लोकांच्या खात्यामधील रक्कमेचा अपहार केला जात आहे. या प्रकरांना आळा घालण्यासाठी रायगड पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. सायबर फसवणुकीत वापरल्या जाणाऱ्या ‘म्यूल अकाउंट’ धारकांविरोधात जिल्हाभर विशेष कारवाई सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी पोलीस अधिक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे यांनी पुढाकार घेतला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून विविध पोलिस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग आहे.
सायबर गुन्हेगारांकडून बरेचदा दुसऱ्यांच्या नावाने बँक खाते उघडून अफरातफरीसाठी आणि फसवणूकीसाठी त्यांच्या बँक खात्यांचा वापर केला जातो. अशा खात्यांना म्यूल अकाऊंट असे संबोधले जाते. सायबर गुन्हेगार विविध आमिषे दाखवून नागरिकांकडून बँक खाती, एटीएम कार्ड, चेकबुक, सिमकार्ड आणि इतर आर्थिक साधनांचा गैरवापर करतात. त्यानंतर फसवणूकीची रक्कम ही म्यूल अकाऊंट्स च्या माध्यमातून वळवली जाते. हीबाब लक्षात घेऊन रायगड पोलीसांनी आता म्यूल खात्यांविरोधात व्यापक कारवाईला सुरूवात केली आहे.
रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलैपर्यंत जिल्ह्यात तब्बल २३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सायबर पोलीस ठाण्यातील १०, कर्जत मधील ३, श्रीवर्धन, अलिबाग, नागोठणे, पोयनाड, रोहा, रसायनी, माणगाव, खोपोली, पेण, कोलाड मधील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे. या गुन्ह्यातील म्यूल अकाऊंट मधून अपहार झालेली रक्कम ३५ कोटी ३० लाख ९७ हजार ७६६ इतकी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलीसांनी सर्व म्यूल अकाऊंट धारकांच्या खात्यांची तपासणी सुरू केली असून, बँकांकडून या खात्यांचे स्टेटमेंटही प्राप्त करून घेतले आहेत. त्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे. महत्वाची बाब म्हणजे सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमधील मुख्य सुत्रधारास पोलीसांनी अटक केली असून, तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्यामुळे तुमच्या बँक खात्याचा म्यूल अकाऊंट म्हणून वापर तर होत नाही ना याची खबरदारी बाळगणे आवश्यक असल्याचे मत पोलीसांनी व्यक्त केले आहे. नागरिकांनी सायबर फसवणुकीबाबत सतर्क राहून संशयास्पद व्यवहारांची त्वरित माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन रायगडच्या पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी केलं आहे.
म्यूल अकाउंट’ गैरवापर कसा होतो.
सायबर गुन्ह्यांमध्ये ‘म्यूल अकाउंट’ ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गुन्हेगारांनी फसवणूक करून मिळवलेले पैसे लपवण्यासाठी किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वळवण्यासाठी हे खातं वापरलं जातात. अनेकदा अशा खात्यांचे धारक स्वतः गुन्हेगार नसतात. पण सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम सर्वप्रथम अशा म्यूल अकाउंटमध्ये जमा केली जाते. त्यानंतर ती रक्कम तातडीने अनेक वेगवेगळ्या खात्यांमध्ये वर्ग केली जाते. नकळतही तुमच्या खात्याचा असा वापर झाला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. म्यूल अकाऊंट्सचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्याची मोहीम आम्ही हाती घेतली आहे. आत्ता पर्यंत २३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, आणखिन ३५ म्यूल अकाऊट्स आमच्या तपासावर आहेत. त्यांच्यावरही लवकरच कारवाई होईल आँचल दलाल, पोलीस अधीक्षक रायगड
