अलिबाग : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्व वैमनस्यातून एकावर गोळीबार करून फरार झालेल्या दोघांना रायगड पोलीसांनी जेरबंद केले आहे. नाशिक परिसरातून दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरेलेला गावठी कट्टा, जिवंत काडतूसे आणि मोटरसायकलही जप्त केली आहे. कर्जत आणि नेरळ पोलीसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

सदर घटना २४ नोव्हेंबर २०२५ रोजी नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती फिर्यादी हे बदलापूरहून स्कुटीवरून घरी येत होते. यावेळी धामोते–पेशवाई रोडवर आरोपींनी सील्वर रंगाच्या सीबीझेड मोटारसायकलवरून पाठलाग केला. त्यांना थांबवले. यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले. गोळीबार करून दोघे आरोपी पसार झाले. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम १०९, १२६(२), ३५१(२) ३(५) तसेच भारतीय हत्यार अधिनियम १९५९ चे कलम ३ आणि २५ मधील तरतूदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आँचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्ष अभिजित शिवथरे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांना दिले होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी नेरळ आणि कर्जत पोलिस ठाण्यांच्या संयुक्त तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली. तांत्रिक विश्लेषणातून आरोपी गुजरात आणि नाशिक परिसरात असल्याचे समोर येत होते. आरोपी सतत ठिकाण बदलत असल्याने त्यांना पकडणे अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र पोलीसांनी तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे पाठलाग सुरू होता. आठ दिवस पोलीसांचे पथक नाशिक मध्ये तळ ठोकून बसले होते.

मोठ्या शिताफीने दोघांनाही पोलीसांनी आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन, शस्त्र आणि काडतुसे जप्त केली आहेत.अविनाश मार्के, आणि दिपक कोळेकर अशी दोघांची नावे आहेत. यातील अविनाश याच्यावर संगमनेर पोलीस ठाण्यातही खुनाचा गुन्हा दाखल आहे.याशिवाय १५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. तर दुसऱ्या आरोपीवरही खुनाचा गुन्हा दाखल आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता १० डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या गुन्ह्याच्या तपासात नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे, पोलीस उपनिरीक्षक सुशिल कानरोळकर, कर्जत पोलीस ठाण्याचे सुशांत वरक, कर्जतचे पोलीस हवालदार स्वप्निल येरुणकर, नेरळचे पोलीस हवालदार सचिन वाघमारे, पोलीस शिपाई आ बी केकाण, पोलीस शिपाई आश्रुबा बेंद्रे, विनोद वांगणेकर यांनी महत्वाची भूमिका बजावली.