अलिबाग: दुचाकी स्वारांचे वाढते अपघात आणि त्यात होणारे मृत्यू लक्षात घेऊन जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय रायगड पोलीसांनी घेतला आहे. हेल्मट परिधान न करून गाडी चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा वाहतूक पोलीसांकडून देण्यात आला आहे.
सन २०२४ मध्ये अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन ११० दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. तर २०२५ मध्ये १०४ जणांचा मृत्यू झाला. २०२६ मध्ये पहिल्या दोन महिन्यात २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तीन वर्षात २४६ जणांचा हेल्मेटचा वापर न केल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला आहे. हेल्मेटचा वापर केला असता तर हे मृत्यू टळण्यास मदत झाली असती.
दुचाकी अपघातांचा वाढते प्रमाण आणि त्यातील होणारे मृत्यू लक्षात घेऊन रायगड पोलीसांनी आता हेल्मेट सक्तीची कठोर अमंलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः महामार्गावर विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या दुचाकीस्वारांवर विशेष मोहीमे अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. २९ मार्चपासून या मोहीमेची सुरूवात केली आहे. ज्याअंतर्गत दुचाकीस्वार आणि त्याच्या मागेबसणाऱ्या वाहनचालकांला हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे.
बरेचदा जवळ जायचे असल्याचे सांगून स्थानिक नागरिकांकडून हेल्मेट सक्तीची कारवाई करू नये अशी विनंती केली जाते. पण अपघात जवळचे किंवा लांबचे अंतर पाहून होत नाहीत. त्यामुळे सर्व नागरिकांनी जवळचे अंतर असो अथवा लांबचे प्रवास करतांना हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलीसांनी केली आहे. जन संपर्क विभागामार्फत याबाबतचे प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे.
