अलिबाग– दुपारी साडेतीनच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील मोबाईल धारकांच्या फोनवर अचानक सतर्कतेचे इशारे देणारे संदेश आणि धोक्याची सूचना देणारे अलार्म वाजू लागले. मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या संदेशांत तीन तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे रायगडकरांची हृदयाची धडधड वाढली होती. पण सुदैवाने जिल्ह्यात या तीन तासात अतिवृष्टी झाली नाही. पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रायगड जिल्ह्यात दुपारी साडेतीनच्या सुमारास हे सतर्कतेचा इशारा देणारे संदेश पाठविण्यात आले होते. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी तीन तासात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज यात वर्तविण्यात आला होता. संदेशासोबत धोक्याचा इशारा देणारे अलार्मही वाजत होते. त्यामुळे रायगडकर धास्तावले होते. दुपारच्या सत्रातील शाळा आणि महाविद्यालयमामध्ये अचानक आलेल्या या संदेशामुळे खळबळ उडाली होती. मात्र सुदैवाने संदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात मोठा पाऊस फारसा कुठे झाला नाही.
जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाच्या सरी बरसत होत्या. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडत होता. मात्र संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत अतिवृष्टीची नोंद कुठेही झाली नाही. जिल्ह्यात सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अलिबाग २२ मिमी, मुरुड २६ मिमी, पेण ३० मिमी, पनवेल ३१ मिमी, माथेरान ३८ मिमी, खालापूर २१ मिमी, रोहा ३२ मिमी, सुधागड ३० मिमी, माणगाव २८ मिमी, तळा २३ मिमी, महाड १४ मिमी, पोलादपूर ८ मिमी, श्रीवर्धन १७ मिमी, म्हसळा ३५ मिमी, उरण ८ मिमी, तर कर्जत येथे ९ मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात कुठेही पूरस्थिती निर्माण होईल असा पाऊस पडला नाही. जिल्ह्यातील सर्व नद्यांची पातळीही इशारा पातळीपेक्षा कमी पातळीवरून वाहत होत्या. जोरदार पावसाचा इशारा आला तरी मोठा पाऊस पडला नाही. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
