अलिबाग: रायगड जिल्हयातील सात तालुक्यांमध्ये शाळा महाविद्यालये उद्या २ जुलै बंद राहणार आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांनी याबाबतचे परीपत्रक जारी केले आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेवून रायगड जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
हवामान खात्याने आज आणि रायगडसाठी पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. आज दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली होती. तर इतर नद्यांच्या पातळीतही मोठी वाढ झाली होती. अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, तळा, म्हसळा आणि पोलादपूर या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम होता.
बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 105 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जिल्ह्यात ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हयातील पनवेल ,अलिबाग, उरण, श्रीवर्धन, तळा, म्हसळा, आणि पोलादपूर सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी, व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांना सुटी देण्यात आली आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये शाळा नियमित सुरू राहणार आहेत. मात्र शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना कामावर यावे लागणार आहे असे जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या परीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
