अलिबाग – रायगड जिल्‍हयातील सहा तालुक्यांमध्ये शाळा महाविद्यालये उद्या ६ जुलै बंद राहणार आहेत. रायगडचे जिल्‍हाधिकारी डॉ. किशन जावळे यांनी याबाबतचे परीपत्रक जारी केले आहे. मुसळधार पावसाची शक्‍यता लक्षात घेवून रायगड जिल्‍हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

हवामान खात्‍याने रायगडसाठी पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. आज दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्‍यामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले होते. अंबा, कुंडलिका , पाताळगंगा नद्यांनी धोका पातळी ओलांडली होती. तर इतर नद्यांच्या पातळीतही मोठी वाढ झाली होती. जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम होता. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी २१५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जिल्ह्यात मोठ्या पावसाची नोंद झाली.

सोमवारी मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवण्‍यात आली आहे. त्‍यामुळे खबरदारीचा उपाय म्‍हणून जिल्‍हयातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी, व्‍यवसाय प्रशिक्षण संस्‍था यांना सुटी देण्‍यात आली आहे.

दरम्यान अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याचा धोका असल्याने जिल्ह्यातील दरड प्रवण गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. तसेच नदी किनाऱ्यावर असलेल्या घरांमधील लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बारा तासानेहून अधिक काळ ठप्प आहे. पावसाचा जोर लक्षात घेतला तर, ही वाहतूक सुरळीत होण्याची चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी महामार्गाचा वापर टाळावा, आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन जिल्हाधिकारी जावळे यांनी केले आहे.