अलिबाग- रायगड जिल्ह्यात जून महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत पहिल्या पंधरा दिवसात २ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. जिल्ह्यात धरणांची पाणी पातळीत मोठी घट झाली असून लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या २८ धरणांमध्ये केवळ १९ टक्के पाणी साठा शिल्लक राहीला आहे. त्यामुळे जलचिंता वाढली आहे.

मोसमी वारे रायगडच्या वेशीवर दाखल झाले आहेत. पण दहा दिवसांपासून त्यांची जिल्ह्यात प्रवेश केलेला नाही. अर्धा जून महिना सरला तरी रायगडकरांना पावसाची प्रतिक्षा आहे. जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे जून महिन्याच्या सुरवातीला मोसमी वारे जिल्ह्यात दाखल होण्यास सुरूवात होते. पण यंदा ते रत्नागिरीतील हर्णे पर्यंत येऊन स्थिरावले आहेत. एल निनोच्या प्रभावामुळे मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाचे आगमन लांबले आहे.

जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीत ३२७ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र १५ जून पर्यंत जिल्ह्यात सरासरी ८.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जूनच्या सरासरी सामान्य पावसाच्या तुलनेत हे प्रमाण अवघे २ टक्के आहे. ही एक चिंतेची बाब आहे. जिल्ह्यात अजूनही पावासाला अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे रायगडकरांना पावासाची आणखिन काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पावसाचे आगमन लांबल्याने पाणी संकट गंभीर रुप धारण करण्याची चिन्ह दिसत आहेत. लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या धरणामध्ये अवघा १९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. आठ प्रकल्पामध्ये दहा टक्क्यापेक्षा कमी तर आठ प्रकल्पामध्ये २० टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. उर्वरीत धरणांमधील पाणी पातळी झपाट्याने घटत आहे. त्यामुळे पावसाचे आगमन आणखिन काही दिवस लांबले तर पाणी संकट गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ७३ गावे आणि २५८ वाड्यांमधील १ लाख ३१ हजार ९९ नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पेण, कर्जत, खालापूर, महाड, पोलादपूर तालुक्यांना भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. हीच परिस्थिती कायम राहील्यास पाणी टंचाई उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरीक चिंतातूर आहेत.

तपमानाचा पारा ४० पार जात आहे. उष्णता आणि हवेतील आद्रता कमालीची वाढली आहे, यामुळे आंगाची काहिली होत आहे. पावासा अभावी शेतीची कामे रेंगाळली असून, पेरण्याही खोळंबल्या आहेत. यंदा ७० हजार हेक्टरवर भात पिकाची लागवड होणे अपेक्षित आहे. पण पाऊस लांबल्याने शेतकरीही पेरणीच्या प्रतिक्षेत आहेत.