अलिबाग- पायाभूत सुविधांच्या विस्तारत असलेले झाळे, दळणवळणाच्या रुंदावणाऱ्या कक्षा यामुळे रायगड जिल्ह्यातील जागा जमिनींच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात जागा जमिनींच्या व्यवहारातून वर्षभरात तब्बल ४ हजार कोटींचा महसूल जमा झाला आहे. मार्च २०२५ च्या तुलनेत मार्च २०२६ मध्ये जवळपास पाचशे कोंटीची भर पडली आहे.
आधी अटल सेतूची उभारणी, नंतर नवीमुंबई विमानतळाची सूरवात, विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पासाठी सूरू झालेले भूसंपादन आणि आता रेवस करंजा पूलाचे सुरू झालेले काम, भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान सूरू झालेली रो रो जल वाहतूक सेवा या सारख्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील जागा जमिनींना मोठी मागणी आली आहे. त्यामुळे जागा जमिनींचे व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे जागा जमिनींच्या व्यवहारातून जमा होणाऱ्या महसूलात मोठी वाढ झाली आहे.
सन २०२२-२३ मध्ये दस्त नोंदणीतून २ हजार ४५० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. २०२३-२४ मध्ये ३ हजार २०६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. तर सन २०२४-२५ मध्ये ३ हजार ६१४ कोटी जमा झाले होते. तर २०२५-२६ या आर्थिक वर्षात ४ हजार ५४ कोटींचा महसूल जमा झाला आहे. वर्षभरात तब्बल १४ लाख २१ हजार ८१२ दस्तांची नोंदणी झाली आहे. पनवेल, उरण, खालापूर, कर्जत, पेण आणि अलिबाग तालुक्यांचा एमएमआरडीए विस्तारीत क्षेत्रात समावेश करण्यात आला. युनिफाईड डेव्हलपमेंट कन्ट्रोल अँण्ड प्रमोशन रेग्युलेशन लागू झाल्यानंतर या परिसरातील बांधकामांवर असलेल्या निर्बंधात मोठी शिथिलता आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात जागा जमिनीमधील गुंतवणूक वाढली आहे. आज देशातील तसेच विदेशातील बांधकाम कंपन्यांनी रायगड जिल्ह्यातील पनवेल, अलिबाग, पेण, खालापूर परिसरात गृहनिर्माण प्रकल्पांची उभारणी सुरु केली आहे.
जिल्ह्यात एकूण २२ दुय्यम निबंधक तथा सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. यापैकी सर्वाधिक महसूल हा मुद्रांक जिल्हाधइकारी कार्यालयाकडून जमा झाला आहे. या कार्यालयातून १ हजार ०७४ कोटी महसूल प्राप्त झाला आहे. पनवेल -३ कार्यालयातून ६३४ कोटी, पनवेल -१ कार्यालयाकडून ५०१, पनवेल २ – ४६८, पनवेल ४ – २०५ पनवेल ५ – १४५- अलिबाग २४९, खालापूर – २९५ कर्जत १ – १३४ कर्जत १- ९१ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. दक्षिण रायगड मधील तालुक्यांमधे जागा जमिनींचे व्यवहार कमी होत आहेत. त्यामुळे या तालुक्यामधून जमा होणाऱ्या महसूलाचे प्रमाण कमी आहे.
गेल्या वर्षी मुद्रांक शुल्कातून ३ हजार ६०० कोटींचा महसूल मुद्रांक शूल्कातून प्राप्त झाला होता. यावर्षी ४ हजार कोटीचा महसूल मिळाला जमा आला आहे. – अमित शेडगे, मुद्रांक जिल्हाधिकारी रायगड
