अलिबाग – रायगड जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी जाहीर झालेल्या ऑनलाइन सोडतीत ४ हजार ३४५ विद्यार्थ्यांची निवड झाली असली, तरी आता खरी कसोटी प्रवेश प्रक्रियेची ठरणार आहे. निवडीनंतर ठराविक कालावधीत कागदपत्रांची पडताळणी पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हुकू शकते, त्यामुळे पालकांसाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
यंदा जिल्ह्यातील २७० खासगी शाळांमध्ये एकूण ४ हजार ७८४ जागा आरटीई अंतर्गत राखीव ठेवण्यात आल्या होत्या. मात्र या जागांसाठी तब्बल ९ हजार ४८९ अर्ज प्राप्त झाल्याने स्पर्धा तीव्र झाली. उपलब्ध जागांच्या जवळपास दुप्पट अर्ज आल्याने संगणकीकृत आणि पारदर्शक पद्धतीने सोडत काढण्यात आली.
सोडतीत निवड झालेल्या ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी केवळ ६२ विद्यार्थ्यांनीच आतापर्यंत प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे उर्वरित हजारो पालकांनी तातडीने शाळांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. अन्यथा प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.
आरटीई अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, पाठ्यपुस्तके, गणवेश यांसह सर्व शैक्षणिक सुविधा मोफत उपलब्ध होणार आहेत. याचा आर्थिक भार शासन उचलणार असल्याने दुर्बल व वंचित घटकांतील कुटुंबांसाठी ही मोठी दिलासा देणारी योजना ठरते. यंदा ग्रामीण आणि दुर्गम भागातूनही मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असल्याचे दिसून आले. शिक्षण हक्काबाबत जागरूकता वाढत असल्याचे हे लक्षण मानले जात आहे. अनेक पालकांनी पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला.
प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे. निवड यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली असून, पालकांना एसएमएसद्वारेही माहिती देण्यात आली आहे. तरीही कागदपत्र पडताळणी व वेळेत प्रवेश याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. एकीकडे आरटीईमुळे हजारो विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची दारे खुली झाली असली, तरी प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर पालकांची सजगता महत्त्वाची ठरणार आहे. योग्य वेळी पावले उचलल्यासच ही संधी प्रत्यक्षात शिक्षणात रूपांतरित होणार आहे.
यावर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. शिक्षणाच्या हक्काबाबत जागरूकता वाढते आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला असून त्यांच्या भविष्यासाठी ही महत्वपूर्ण संधी ठरणार आहे. – ललिता दहीतुले, शिक्षणाधिकारी रायगड जिल्हा परिषद
