अलिबाग : रायगड जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा दि. १९ जून २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत दुपारच्या सत्राऐवजी सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार आहेत.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रायगड जिल्ह्यासाठी उष्ण व दमट हवामानासह दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यंदा एलनिनोच्या प्रभावामुळे मान्सूनचे आगमन उशिरा होत असून जिल्ह्यात तापमान आणि आर्द्रतेचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. परिणामी उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळांचे वेळापत्रक बदलण्याची विनंती केली होती. त्यानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
स्थानिक हवामान परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दुपारच्या सत्रातील शाळा सकाळी भरविणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित शिक्षण विभाग, शाळा व्यवस्थापन आणि अंगणवाडी यंत्रणेला आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना या आदेशाचे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पप्पा मानाचा पारा तापमानाचा पारा 40°c वर पोहोचला आहे. हवेतील आद्रतेचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे प्रचंड घाम येत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका होऊ नये यासाठी दुपारच्या सत्रातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहे.
