अलिबाग- चला शाळेत जाऊ या अभियानासाठी रायगड जिल्ह्यात आलेल्या शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी कार्यक्रमा दरम्यान शिक्षण अधिकारी आणि शिक्षक वर्गाची कानउघाडणी केली. जिल्हा परिषद आणि मराठी शाळांमधील  घटती पटसंख्या रोखण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडून पाऊले उचला आणि गुणवत्ता वाढीवर भर द्या असे निर्देश अधिकारी आणि शिक्षक वर्गाला दिले.

चला शाळेत जाऊ या अभियानासाठी दादा भुसे हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी अलिबाग तालुक्यातील शाळांना भेट देऊन पहाणी केली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथील मुख्य कार्यक्रमाला हजेरी लावली, यावेळी पालकमंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचाारी, शाळामधील शिक्षक उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात  शासकीय शाळांमधील पट कमी होत आहे. जिल्ह्यात १ ते ५ पट असलेल्या ३६५ शाळा आहेत. शैक्षणिक दर्जाच्या बाबतीत  रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या देखील रायगड जिल्हा मागे आहे .  हे भूषणावह नाही ,  अशा शब्दात महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांची कानउघडणी केली .

जिल्हा परिषद शाळामधील घटणारी पटसंख्या ही चिंतेची बाब आहे. खाजगी शाळांच्या तुलनेत घटलेली गुणवत्ता हे यामागील कारण आहे. त्यामुळे शाळांची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण अधिकारी आणि शिक्षक वर्गाने प्रयत्न करायला हवेत असे मत शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केले. शिक्षण अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून न राहता शाळांपर्यंत पोहोचले पाहीजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छता गृह यांची सोय असायलाच हवी, त्यासाठी उचीत कार्यवाही करा, नादुरुस्त शाळांची दुरुस्ती, रंग रंगोटी यासाठीचे प्रस्ताव सादर करावेत, धोकादायक शाळांच्या इमारती तातडीने निर्लेखित कराव्यात असे निर्देश त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी भर दिला पाहीजे असे निर्देशही त्यांनी यंत्रणांना दिले.

काही शिक्षक जीव ओतून विद्यार्थ्यांना शिकवतात. ते आयडॉल शिक्षक बनतात. पण काही शिक्षक मुलांना शिकवण्यावर भर देण्याऐवजी भलतीच कामे करतात. दोघांनाही सारखाच पगार मिळतो. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्यावर भर दिला पाहीजे असे मत पालकमंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केले. तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्ही नक्की सोडवू, पण मुलांना अध्यापनाकडे दुर्लक्ष व्हायला नको अशी अपेक्षा गोगावले यांनी व्यक्त केली.