श्रीवर्धन – श्रीवर्धन म्हसळा मार्गावरील बोडणीची डाग येथे एका तीव्र उतारावर ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रेलर पीक अप टेम्पोवर कोसळला. या भीषण अपघातात टेम्पो चालकाचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक ०२ मे रोजी सकाळी आठ वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार , बागमांडला – बाणकोट खाडी वर पुलाचे काम सुरू असून नवी मुंबई येथून बागमांडला येथे पुलाचे साहित्य घेऊन जाणारा ट्रेलर चालक तौफेल सलाउद्दीन अहमद (कळंबोली) याने श्रीवर्धन म्हसळा हा घाट रस्ता व वळणदार तीव्र उताराचा असून देखील आपल्या ताब्यातील ट्रेलर (एम एच ४६ बी बी ४७१२) निष्काळजीपणे श्रीवर्धन च्या दिशेने आणत होता. बोडणीची डाग येथील एका वळणदार तीव्र उतारावर चालकाचा ट्रेलर वरील ताबा सुटल्याने ट्रेलर ने अगोदर एका चारचाकी ला धडक दिली व आंबा वाहतूक करणाऱ्या एम एच ०६ जी ९३२० या क्रमांकाच्या महेंद्रा पीक अप टेम्पोवर ट्रेलर कोसळला.

या भीषण अपघातात बागमांडला येथील टेम्पो चालक अजय भालचंद्र जाधव (वय २५) हा जागीच ठार झाला. ट्रेलर रस्त्यावर आडवा झाल्याने काही वेळ वाहतूक खोळंबली होती.