अलिबाग – रायगड जिल्ह्यात भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढत असून, त्यातून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जानेवारी २०२५ ते ऑगस्ट २०२६ या २० महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ३ हजार ६६० नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी २ हजार ६५१ जणांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात आले, तर १ हजार ९ जणांना अधिक उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ग्रामीण भागासह जिल्ह्यातील विविध शहरी भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर वाढताना दिसत आहे. गल्ली, वसाहती, बाजारपेठा, एसटी स्थानक परिसर तसेच रहिवासी भागांमध्ये मोठ्या संख्येने भटके कुत्रे फिरताना आढळतात. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२५ या वर्षभरात जिल्ह्यात २ हजार ११५ नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. त्यानंतर जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांत आणखी १ हजार ५४५ नागरिकांना कुत्र्यांच्या हल्ल्याचा सामना करावा लागला. अशा प्रकारे २० महिन्यांत हल्ल्यांची संख्या ३ हजार ६६० वर पोहोचली आहे. यातील २ हजार ६५१ नागरिकांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर बाह्यरुग्ण विभागात प्राथमिक उपचार करण्यात आले. तर १ हजार ९ जणांना गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा प्रश्न केवळ उपद्रवापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित बनला आहे.

लहान मुले, महिला आणि ज्येष्ठांमध्ये भीती

रस्त्यांवर आणि रहिवासी भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचे कळप फिरत असल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः सकाळी आणि रात्रीच्या वेळी रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना सावधगिरी बाळगावी लागत आहे. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मागे कुत्रे लागण्याच्या घटनाही घडत आहेत. अचानक कुत्रे रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वारांचा वाहनावरील ताबा सुटून अपघात होण्याचा धोका निर्माण होतो.

शहर तसेच ग्रामीण भागातील काही ठिकाणी उघड्यावर टाकला जाणारा कचरा आणि मांसाहारी अन्नपदार्थांचे अवशेष यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत असल्याचे दिसून येते. एसटी स्थानक, बाजारपेठा आणि रहिवासी परिसरात कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लागल्यास कुत्र्यांचे कळप त्या ठिकाणी जमा होतात. त्यामुळे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी कचरा व्यवस्थापनासोबतच भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठीही प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.

बंदोबस्ताची मागणी

जिल्ह्यात २० महिन्यांत ३ हजार ६६० नागरिकांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासनाने नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः शाळा, बाजारपेठा, एसटी स्थानक आणि रहिवासी भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.